उपमुख्यमंत्री शिंदेंची आमदार पाटील यांच्याशी भेट; माढ्यासाठी विविध विकासकामांना निधीची मागणी
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांसाठी आमदार अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन निधीची मागणी केली.
या भेटीत आमदार पाटील यांनी मतदारसंघातील महत्त्वाच्या योजनांबाबत निवेदन सादर केले. माढा शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माढा शहरात भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशीही मागणी करण्यात आली. श्रीपूर महाळुग नगरपंचायतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी जागा खरेदी व बांधकामासाठी ५ कोटी रुपये देण्याची मागणीही करण्यात आली.
याशिवाय माढ्यातील मनकर्णा नदी परिसराचे सुशोभीकरण व घाट बांधणीसाठी १० कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे धार्मिक व पर्यटन विकासाला चालना मिळून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
माढा नगरपंचायतीसाठी नवीन प्रशासकीय इमारत आणि सुसज्ज सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणीही यावेळी करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment