गॅसनंतर खाद्यतेलही महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 4, 2026

गॅसनंतर खाद्यतेलही महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

 गॅसनंतर खाद्यतेलही महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

सोलापूर (कटूसत्य वृत्त): वाढत्या महागाईच्या फटक्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता खाद्यतेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. प्रतिलीटर सुमारे २० ते २५ रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींचे मासिक बजेट पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दैनंदिन वापरातील अत्यावश्यक घटक असलेल्या खाद्यतेलाच्या दरवाढीचा थेट परिणाम सामान्य कुटुंबांवर होत आहे.

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्याचे दिसून येत आहे. आखाती युद्धाच्या सावटामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा फटका स्थानिक बाजारपेठेलाही बसत आहे. सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शहरातील विविध किरकोळ बाजारांमध्ये १५ लिटरच्या डब्यामागे तब्बल २०० ते २५० रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीत तळलेल्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. वडापाव, भजी, पुरी-भाजी यांसारख्या पदार्थांचा रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. मात्र, तेलाच्या दरवाढीमुळे हॉटेल, उपाहारगृहे आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे लवकरच खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, ग्राहकांच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, मलेशियातून आयात होणारे पामतेल तसेच अमेरिका आणि युक्रेनमधून येणारे सोयाबीन व सूर्यफूल तेल यांच्या पुरवठ्यावर सध्या परिणाम झाला आहे. आयात खर्च, वाहतूक दरांतील वाढ आणि जागतिक अनिश्चिततेमुळे तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, व्यापारी विजय परदेशी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय अस्थिरता, आयात शुल्कात वाढ, वाहतूक खर्च आणि तेलबियांच्या उत्पादनात घट यामुळे सध्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढीव आयात खर्चामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही वाढीव दरानेच विक्री करावी लागत आहे.

खाद्यतेलांचे सध्याचे दर (प्रति लिटर):

  • शेंगातेल – १८८ रुपये
  • सोयाबीन तेल – १७४ रुपये
  • सूर्यफूल तेल – २०० रुपये
  • करडी तेल – ३२० रुपये
  • रोहिणी तेल – १७४ रुपये

एकूणच, गॅसनंतर खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, महागाईचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages