आरोग्य व्यवस्थापनात सोलापूर महापालिका राज्यात दुसरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त): आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धतीअंतर्गत कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या फेब्रुवारी अखेरच्या कामगिरीत सोलापूर महापालिकेने ९१ गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
१६ मार्च रोजी जाहीर झालेल्या जिल्हानिहाय महापालिका अहवालात ही उल्लेखनीय कामगिरी नोंदविण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित मानले जात असून, महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
माता आरोग्य कार्यक्रमांतर्गत गरोदर माता नोंदणी ९७ टक्के, १२ आठवड्यांपूर्वी नोंदणी ८९ टक्के, गरोदर मातांचे लसीकरण ८९ टक्के, आयएफए १८० गोळ्या वितरण १०३ टक्के तर प्रसूतिपूर्व चार तपासण्या १०१ टक्के इतक्या उच्च पातळीवर पूर्ण झाल्या आहेत. अतिजोखमीच्या माता २७ टक्के नोंदविण्यात आल्या असून तीव्र रक्तक्षय असलेल्या केवळ ४ टक्के मातांपैकी ९७ टक्क्यांना उपचार देण्यात आले आहेत.
बाल आरोग्य कार्यक्रमात ६६ टक्के जिवंत जन्म नोंदविण्यात आले असून २.५ किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण १८ टक्के आहे. नियमित लसीकरणात हेपाटायटिस बी (६५ टक्के) व व्हिटॅमिन ए (८३ टक्के) वगळता इतर सर्व निर्देशांक ८८ ते ९२ टक्क्यांदरम्यान पूर्ण झाले आहेत.
कुटुंब नियोजन कार्यक्रमात शस्त्रक्रिया ५१ टक्के, पीपीआययूसीडी ३६ टक्के आणि शासकीय संस्थांमधील प्रसूतीपैकी २३ टक्के प्रकरणांत पीपीआययूसीडी बसविण्यात आल्या आहेत. जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, नसबंदी शस्त्रक्रिया, बालकांचे लसीकरण, कुपोषण नोंदणी व उपचार, रक्तक्षय तपासणी तसेच कर्करोग तपासणी अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
आयुक्त डॉ. ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे आणि आरोग्याधिकारी डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही कामगिरी साध्य केली आहे. डॉ. मंजिरी कुलकर्णी, आरसीएच स्टाफ तसेच सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे.
.png)
No comments:
Post a Comment