सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १२ कोटींची योजना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेने सुमारे १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. यासोबतच अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या दुरुस्ती कामांनाही गती देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली.
मंगळवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत पाणीटंचाई परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, एप्रिल ते जून या कालावधीत संभाव्य टंचाई लक्षात घेऊन १२ कोटी ४ हजार १० रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात २४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे ३२ हजार लिटर क्षमतेच्या खासगी टँकरद्वारे दररोज दोन फेऱ्यांत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
बैठकीत पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि शाळांच्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी इमारती अत्यंत जीर्ण किंवा धोकादायक अवस्थेत आहेत, त्या ठिकाणी त्या पाडून नव्याने इमारत उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
गुळवंची येथील आरोग्य उपकेंद्र आणि मंद्रूप येथील अंगणवाडी इमारतींच्या स्थितीचा विशेष आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांनी समन्वयाने पाहणी करून तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील विविध शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकर मागणीनुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व शाळांच्या इमारतींच्या दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment