RTE प्रवेशासाठी ९६५ जागा रिक्त; ३० एप्रिलपर्यंत अंतिम संधी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या RTE योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १,७०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मात्र अजूनही ९६५ जागा रिक्त असून पात्र विद्यार्थ्यांना ३० एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे.
जिल्ह्यात एकूण २८६ शाळा RTE प्रवेशासाठी पात्र असून २,६७३ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापैकी अद्याप मोठ्या संख्येने जागा रिक्त असल्याने शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी विलंब न करता संबंधित शाळांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
तालुकानिहाय रिक्त जागा पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट - १६, बार्शी - ५२, करमाळा -४५, माळशिरस - ८८, मंगळवेढा - २५, मोहोळ - ७०, माढा - ९६, पंढरपूर - १९६, सांगोला - १०३, उत्तर सोलापूर - १५८, दक्षिण सोलापूर - २८, सोलापूर शहर- ८८. एकूण रिक्त जागा - ९६५.
दरम्यान, प्रवेशासाठीची मुदत वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
“आरटीई अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांनी तत्काळ प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. मुदतवाढ दिली असली तरी शेवटच्या क्षणाची वाट पाहू नये,” असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment