दक्षिण सोलापूर-अक्कलकोटमध्ये ३८ उपद्रवींवर तडीपार कारवाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील ३८ उपद्रवी गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करून प्रशासनाने त्यांच्यावर प्रभावी अंकुश आणला आहे. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोलापूर क्र. २ सुमित शिंदे यांनी गेल्या तीन वर्षांत ही कारवाई करत गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसविला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून प्राप्त प्रस्तावांवर आधारित ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तडीपारची कारवाई केली जाते. त्यानुसार २०२३ मध्ये ८, २०२४ मध्ये १२, २०२५ मध्ये ६ आणि २०२६ मध्ये आतापर्यंत १ अशा एकूण प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. तसेच कलम ५७ अंतर्गत पुनरावृत्ती करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाते. या कलमानुसार २०२४ मध्ये ११ प्रकरणांमध्ये तडीपारची नोंद झाली आहे.
दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तडीपार ही त्यातील एक प्रभावी कारवाई असून, याअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना ठरावीक कालावधीसाठी जिल्हा किंवा परिसरातून बाहेर काढले जाते. त्यामुळे स्थानिक पातळीवर गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होते.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व महसूल विभाग समन्वयाने काम करत असल्याचे दिसून येते. आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment