उच्च दर्जाची गुणवत्ता प्राप्त मुलांना बेकारीची समस्या भेडसावत नाही- अध्यक्ष रामचंद्र भांगे
माढा (कटूसत्य वृत्त):- देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्या मिळाल्यानंतरही अनेक मुलांना बेकारीची समस्या भेडसावत आहे. ज्यांच्याकडे उच्च कोटीची गुणवत्ता व विविध क्षमता विकसित नसतात त्यांना उच्च शिक्षण घेऊनही शासकीय नोकरीत संधी मिळत नाही.ते नेहमीच सगळीकडे बेकारी आहे,देशात नोक-या मिळत नाहीत म्हणून उदासीन होऊन डांगोरा पिटतात.परंतु जी मुले उच्च दर्जाची गुणवत्ता प्राप्त व क्षमताधिष्ठित असतात ती या स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडत नाहीत.ती स्वतःमधील गुणवत्तेच्या जोरावर उच्च पदांना नक्कीच गवसणी घालतात त्यामुळे उच्च दर्जाची गुणवत्ता प्राप्त असलेल्या मुलांना बेकारीची समस्या कधीच भेडसावत नसल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे यांनी केले.
ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे मार्च 2026 मध्ये घेतलेल्या लेखी व तोंडी स्पर्धा परीक्षेतून 150 पैकी 136 गुण प्राप्त करून मुंबई लोहमार्ग आयुक्तालयात 14 व्या क्रमांकाने उत्तीर्ण नूतन लोहमार्ग पोलीस शुभम सत्यवान शिंगाडे याचा सत्कार करताना बोलत होते.
प्रास्ताविक विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.
यावेळी शुभम शिंगाडे याचा सहकुटुंब सहपरिवार वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे व सुजाता भांगे आणि मित्रमंडळींच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. त्याला पेढे भरवून त्याचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.
यावेळी उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांनी शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे.विविध प्रकारच्या शासकीय व खाजगी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन दर्जेदार साहित्य व पुस्तके वाचण्याची सवय लावली पाहिजे.आपल्या मुलांना मोबाईल,टिव्ही,सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, वाईट व्यसन व संगतीपासून दूर ठेवण्यासाठी आई-वडीलांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी कमलाकर शिंगाडे, सचिव नेताजी उबाळे,सुशेन भांगे,सुहास शिंगाडे,सौदागर गव्हाणे,पो.कॉ.महावीर बरकडे, मेजर आकाश खरात, शिवाजी कोकाटे,सत्यवान शिंगाडे,मोहन भांगे,लोचना शिंगाडे,सुजाता भांगे,सुवर्णा भांगे,मनिषा शिंगाडे,शांता भांगे,प्रियांका भांगे,दत्तात्रय काशीद,समर्थ शिंगाडे,महेश भांगे,सक्षम भांगे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
.png)
No comments:
Post a Comment