दूध दरकपातीमुळे रोज २४ लाखांचा फटका; प्रतिलिटर दोन रुपये कपात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 10, 2026

दूध दरकपातीमुळे रोज २४ लाखांचा फटका; प्रतिलिटर दोन रुपये कपात

 दूध दरकपातीमुळे रोज २४ लाखांचा फटका; प्रतिलिटर दोन रुपये कपात


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातून दूध संकलन करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील दोन मोठ्या खाजगी उद्योगांनी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात कपात केली आहे. प्रतिलिटर दोन रुपये इतकी कपात करण्यात आली आहे.

यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दररोज २४ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दूध व्यवसायात सुधारणा दिसू लागली होती. मात्र, युद्धाचे कारण पुढे करत खाजगी उद्योगांनी पुन्हा एकदा दरात कपात करत शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मंदीच्या तडाख्यात असलेल्या दूध व्यवसायाला चालू वर्षात बरे दिवस येण्याची चिन्हे दिसत होती. गेल्या दोन महिन्यांत दुधाच्या दरात सातत्याने सुधारणा होऊ लागली होती. गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर ३९ ते ४० रुपये झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक गायीचे दूध उत्पादक असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. दररोज सुमारे २५ लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते.

अमेरिका-इराण युद्धापूर्वीच दूध व्यवसायात तुटवडा जाणवू लागला होता. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादनही घटण्यास सुरुवात झाली होती. बाजारातील दुग्धजन्य उपपदार्थांची वाढलेली मागणी आणि कमी झालेले उत्पादन याचा परिणाम दिसू लागला होता. फेब्रुवारीपर्यंत गतवर्षीच्या तुलनेत गायीच्या दुधाच्या खरेदी दरात चार ते पाच रुपयांची वाढ झाली होती. मात्र, युद्ध सुरू होताच त्याचे परिणाम दूध व्यवसायावर दिसू लागले.

गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांनी पदरमोड करत दारातील जनावरे जगवली आहेत. दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या हातात काहीतरी उरण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, युद्धाने तीही हिरावून घेतली आहे.

जिल्हा दूध संघाची जाणवू लागली उणीव

जिल्ह्यात दररोज सुमारे २५ लाख लिटर गायीचे दूध उत्पादन होते. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील दोन मोठे संघ अनुक्रमे सात लाख व पाच लाख लिटर दूध संकलित करतात. उर्वरित दूध अमूल या गुजरातमधील संघाबरोबर परराज्यातील काही खाजगी संघांकडे जाते. तसेच, सध्या जिल्ह्यातील 'शिवामृत' हा एकमेव सहकारी संघ दूध संकलित करतो. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात सक्षम जिल्हा दूध संघ असल्यामुळे तेथील दूध उत्पादकांना न्याय मिळतो. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील दूध व्यवसाय खाजगी दूध संघांच्या मगरमिठीत सापडल्यामुळे आर्थिक लूट होत असल्याचा दावा केला जातो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages