सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

 सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांना जादा दराने खते आणि बियाण्यांची विक्री करणाऱ्या, तसेच त्यांना फसवणाऱ्या १९ कृषी केंद्रांवर सोलापूर जिल्हा कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. या केंद्रांचे विक्री परवाने तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ११ तालुक्यांतून शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी अधिकारी आणि तालुका गुणवत्ता निरीक्षकांच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीमध्ये अनेक ठिकाणी खतांच्या विक्रीत अनियमितता, अवाजवी दराने पावती देणे आणि नियमापेक्षा अधिक साठा करणे असे प्रकार समोर आले. या पार्श्वभूमीवर, १५ एप्रिल रोजी संबंधित दुकानदारांची सुनावणी घेण्यात आली होती.

तपासणीदरम्यान ज्या दोन ठिकाणी गंभीर अनियमितता आढळली, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, त्यात हन्नूर (ता. मंगळवेढा) येथील 'गोवर्धन कृषी केंद्र' येथे विनापरवाना अधिक साठा आढळला तर मोडनिंब येथील 'सुकांत जयकुमार दोशी कृषी केंद्र' येथेही विनापरवाना अधिक साठा आढळला, या दोन्ही दुकानदारांवर आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांची दिशाभूल किंवा फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरुद्धची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

युरियाचा वापर संशयास्पद

जिल्ह्यात मार्च २०२५ मध्ये जिल्ह्यात १५ हजार मेट्रिक टन युरिया वापरला होता. मात्र, मार्च २०२६ मध्ये हा वापर थेट २२ हजार मेट्रिक टनावर पोहोचला आहे. ही कमालीची वाढ संशयास्पद असून, या प्रकरणाची सखोल पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यातील ३,००० ते ३,५०० शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages