शक्तिपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात शेतकऱ्यांचा एल्गार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

शक्तिपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात शेतकऱ्यांचा एल्गार

 शक्तिपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात शेतकऱ्यांचा एल्गार


संयुक्त मोजणी रोखण्याचा इशारा

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गास जोरदार विरोध दर्शवला आहे. या प्रश्नी आज गुरुवारी (दि.२३ एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात शक्तिपीठ विरोधी कृती समितीची बैठक झाली.

राज्य सरकारने जबरदस्तीने शेतकऱ्यांची संयुक्त जमीन मोजणी करण्याचे प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.

भूसंपादनाच्या मोबदल्याची चुकीची आकडेवारी सांगितली जात आहे. अशा पद्धतीने राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करून शक्तिपीठ महामार्ग पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उसासह फळबागा, द्राक्षे, केळी यासारखी पिके घेत आहे. पण या महामार्गामुळे पिकाखालील बागायती क्षेत्रात मोठी घट होणार आहे. यामुळे येथील अनेक ग्रामपंचायतींनी महामार्गास विरोध केला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कराड याठिकाणी जाण्यासाठी पर्यायी सहा रस्ते उपलब्ध आहेत. असे असताना हा महामार्ग कशाला? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.

वाळू उपसासाठी भीमा नदीपात्र कोरडे ठेवले, पिके वाळू लागली

त्याबरोबरच उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे बंद असल्याने शेतपिके वाळू लागली आहेत. वाळू ठेकेदारांशी संगनमत करून वाळू उपसा करण्यासाठी नदीपात्र कोरडे ठेवले जात आहे. यामुळे तातडीने पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मिळून भीमा नदीपात्रात आंदोलन करतील, असाही इशारा देण्यात आला आहे.

यावेळी झालेल्या बैठकीत स्वाभिमानी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तानाजी बागल, सचिन शिंदे, अजित बोरकर, काका पाटील, सचिन आडके यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages