'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाला घरात घुसून मारण्याची धमकी
आ.संजय गायकवडांना 37 वर्षांनी आली जाग!
- - ''पानसरेंचं काय झालं माहितीये ना?"; असे म्हणत धमकी
- - आ. संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल
मुंबई (कटूसत्य वृत्त):- दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहलेल्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून आता नवा वाद सुरू झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.
संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचे म्हणत आंबी यांन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय ही ऑडिओ क्लीप माझीच असल्याचं आमदार गायकवाड यांनी मान्य केलं आहे.
आमदार गायकवाड नेमकं काय म्हणाले?
या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संजय गायकवाड म्हणतात की, "शिवाजी कोण होता? असा एकरी उल्लेख का केलाय तुम्ही शिवाजी महाराजांना एकेरी बोलता का? त्यावर प्रशांत आंबी म्हणतात की, "हे पुस्तक गोविंग पानसरे यांनी लिहिलं आहे."
नंतर गायकवाड म्हणतात : अरे तो कोण आहे? तुला माहितेय ना गोविंग पानसरेचे काय हाल केलेत.
प्रशांत आंबी : हो माहितेय मला.
गायकवाड : मग ब्राह्मण आहे का तू?
आंबी : मी ब्राह्मण नाही.
गायकवाड : जास्त शहाणपणा करू नको मी आमदार संजय गायकवाड आहे. घरात घुसून मारेन साल्या.
आंबी : धमक्या देऊ नका.
गायकवाड : मी व्यवस्थीत बोलतोय तू लिहिलं कसं? तु राहतो कुठं?
आंबी : मी कोल्हापुरात राहतो.
गायकवाड : मी घरात घुसून मारेन. ते म्हणाले नाव आणि बदल तुझी भाषा बदलं, अशी धमकी गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, प्रशांत आंबी यांनीही संजय गायकवाडांना 'तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या', असं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गायकवाड म्हणाले, ज्या पद्धतीने त्याने जी मुजोरी ठेवली मी त्याला विचारत असताना तो मला सारखा डिवचतं होता.
म्हणून मी जीभ हासडायची भाषा केली आणि अशा लोकांना शंभर टक्के जीभ हासडायची भाषा केली पाहिजे. शिवाय अशा पुस्तकांमध्ये जी शिवरायांबद्दल एकेरी भाषा वापरली आहे ती आम्ही या महाराष्ट्रात नाही सहन करू शकत, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.
मुंबईत आमदार निवासातील कँटीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड पु्न्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्कतावरून त्यांनी संताप व्यक्त केला. पण हा संताप व्यक्त करताना या यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता कोल्हापुरात या प्रकरणी प्रकाशक आंबी यांनी तक्रार अर्ज दाखल केली आहे.
आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन अश्लील शिवीगाळ केली होती. या फोन कॉलचा कथित ऑडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. ज्यात आमदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? असे म्हणत गोविंद पानसरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.
आंबी यांना घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच, पानसरेंचे काय झाले? माहिती आहे ना? असाही इशारा दिला होता. यानंतर आता कोल्हापुरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून आमदार गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. तसेच आमदार गायकवाड यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.
शहरातील राजारामपूरी पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्या विरोधात प्रकाशक प्रशांत आंबी यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर पोलिसांनी याबाबत माहिती देताना योग्य तो तपास करून पुठील कारवाई करू असे म्हटले आहे. दरम्यान आमदार गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलनकांनी गायकवाड यांच्या पुतळ्याला जोडे मारले तसेच जोरदार निदर्शने केली आहे.
चौकट
रोहिणी खडसेंकडून समाचार
"दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल ३७ वर्षांपूर्वी लिहलेल्या 'शिवाजी कोण होता', या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला आहे. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गायकवाड यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय करू शकतो ? वाचन आणि त्यांचा काही दूर दूरपर्यंत काही संबंध असेल याची शक्यता कमीच आहे. पण समाजात वितुष्ट निर्माण करण्यात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांनी पीएचडी घेतल्याची टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे.
चौकट
वकील सरोदेंचे थेट गायकवाडांना आव्हान
तर वकील असीम सरोदे यांनी थेट गायकवाडांना आव्हान देत 'शिवाजी कोण होता' या पुस्तकांचे जाहीर वाचन आपण बुलढाण्यात लवकरच करणार असल्याचे जाहीर केले. तसेच गायकवाड काय करतात हे बघू असेही आव्हान दिले आहे.

No comments:
Post a Comment