मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद

 मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद


 पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोहोळ येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेदरम्यान पेहरावाच्या कारणावरून दोन गटांत झालेला वाद पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मिटवला.

पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पालखी मिरवणूक शांततेत पार पडली. सध्या शहरात शांतता असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ एप्रिल रोजी रात्री ९:१५ च्या सुमारास श्री खर्गे महाराज मिरवणुकीसाठी आले असता, त्यांनी भगवा फेटा आणि भगवी कफनी परिधान केली होती. या पेहरावावर इतर मानकरी आणि काही तरुणांनी आक्षेप घेतला. ‘केवळ पांढरा फेटा आणि पांढरा गणवेश’ असावा या आग्रहावरून दोन्ही गटांत शाब्दिक चकमक उडाली.

या वादामुळे मिरवणूक निघण्यास उशीर झाला. पालखी सोहळ्यासाठी जमलेले सुमारे ४ ते ५ हजार भाविक या अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे काही काळ घाबरले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी तातडीने दोन्ही बाजूंना शांत केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांशी सविस्तर चर्चा केली. अखेर, सर्वानुमते खर्गे महाराज यांनी पांढरा गणवेश परिधान करण्याचे मान्य केले आणि वादावर पडदा पडला.

वाद मिटल्यानंतर नागनाथ महाराजांची मिरवणूक उत्साहात सुरू झाली. आकर्षक अशा शोभेच्या दारूकाम कार्यक्रमानंतर मिरवणूक शांततेत संपन्न झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी आधीच खबरदारी म्हणून नागनाथ महाराज ट्रस्टच्या १५ सदस्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या.

चौकट-
”मानपमानाच्या किरकोळ गोष्टी विसरून जाऊन यात्रेचा आनंद घ्या. सध्या मोहोळ शहरात पूर्णपणे शांतता आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, शहरात पुरेशा प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.”

-बाजीराव पोवार पोलीस निरीक्षक, मोहोळ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages