१ मेनंतर सिंगल यूज प्लास्टिकवर कडक कारवाई; अक्कलकोट नगर परिषदेचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 11, 2026

१ मेनंतर सिंगल यूज प्लास्टिकवर कडक कारवाई; अक्कलकोट नगर परिषदेचा इशारा

 १ मेनंतर सिंगल यूज प्लास्टिकवर कडक कारवाई; अक्कलकोट नगर परिषदेचा इशारा

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : शहरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांवर १ मे २०२६ नंतर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिला आहे. यासोबतच कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजनाबाबतही कठोर उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अक्कलकोटमधील व्यापारी संघटनांची बैठक मुख्याधिकारी डाके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सिंगल यूज प्लास्टिक बंदी, कचरा वर्गीकरण व संकलन तसेच शहरातील वाढती वाहतूक कोंडी या प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगरपरिषदेकडून व्यापाऱ्यांना १ मे २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे. तसेच बाजारपेठ परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही दंड आकारण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी व्यापारी महासंघाच्या विनंतीनुसार विशेष ‘घंटागाडी’ कचरा संकलनासाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहितीही डाके यांनी दिली.
दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही रस्ते एकेरी करण्याचा प्रस्ताव तसेच जड मालवाहतूक वाहनांच्या वेळेचे नियोजन करण्याबाबतही चर्चा झाली. या उपाययोजनांना व्यापारी महासंघाने सकारात्मक प्रतिसाद देत नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष महिनाथ साखरे यांनी दिली.
बैठकीस स्वच्छता निरीक्षक नितीन शेंडगे, शहर समन्वयक शुभम माने यांच्यासह व्यापारी महासंघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages