महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन; ठेकेदाराच्या डोक्यावर मंत्र्याचा वरदहस्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2026

महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन; ठेकेदाराच्या डोक्यावर मंत्र्याचा वरदहस्त

 महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन; ठेकेदाराच्या डोक्यावर मंत्र्याचा वरदहस्त




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- "मंत्र्यांचे दौरे असल्यावर, आठ एकादशी व चार यात्रा कालावधीत च मी चालू असते किंवा बिल काढण्याच्या दोन दिवस अगोदरच मी सुरू असते, इतरवेळी मात्र मी कायम बंदच असते त्यामुळे साहेब माझ्या चंद्रभागा जलशुद्धीकरणाचे कामाचे बील काढू नका, कारण आम्ही चंद्रभागेचे पाणी शुध्द केलेले नाही." अशा आशयाचा डिजीटल फलक चंद्रभागेच्या पात्रात जलशुद्धीकरणासाठी उभारण्यात आलेल्या सेबर टेक्नॉलॉजी च्या मशिनरीवर लावण्यात आलाय.

पंढरपुर मधील महर्षी वाल्मिकी संघाचे वतीने हे अनोखं आंदोलन सुरू केले आहे. आजपर्यंत या मशिनरी बसवलेल्या ठेकेदाराचे साडे पाच कोटी बिल शासनाने अदा केलेय, एकुण २४ ते अठ्ठावीस कोटींचे आणखी बील संबंधित ठेकेदार शासनाकडून उधळणार आहे, या ठेकेदारावर एका मंत्र्याचा वरदहस्त असल्याने भक्त पुंडलिकरायाच्या समोरंच पवित्रं चंद्रभागेच्या पात्रात ही पत्र्याची बिनकामाची डबडी उभारून शासनाला कोट्यावधीचा गंडा घालण्याचं महापातक चंद्रभागेच्या जलशुद्धीकरणाचे नावाखाली केले जात आहे. हे आम्ही कदापीही खपवून घेणार नाही,.

संबंधित ठेकेदाराच्या व या मशिनरीच्या जलशुद्धीकरण कामाची शहानिशा केली तर‌ फक्त एकादशी, यात्रा कालावधीत व मंत्री महोदयांचे दौरे असतात तेंव्हाच या मशिनरी सुरु केल्या जातात. इतरवेळी कायम बंद असतात, मग यासाठीचे कोट्यावधी रूपयांची बीलं शासनाने का द्यावी? असा खडा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे. 

एकीकडं शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे, पंढरपूर नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती सुध्दा नाजूक आहे असे बोलले जाते, आणि त्यामुळे पंढरीतील कित्येक प्रश्न प्रलंबित आहेत. आणि इथं विठुरायाच्या समोरंच सेबर टेक्नॉलॉजी मशिनरीजच्या माध्यमातून कुंपनच शेत खातेय, कोट्यावधी रूपये खर्च करून पांढरा हत्ती पोसला जातोय, अरे कुठं फेडाल हे महापाप? 

आमची बहिण चंद्रभागा, भाऊ भक्त पुंडलिकराया दुर्गंधीच्या साम्राज्यात, प्रदुषणाच्या विळख्यात कायमच असतात, हे विदारक चित्रं प्रत्यक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदारांनी येऊन बघावे. म्हणजे दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करत गणेश अंकुशराव व सहका-यांनी संबंधित मशिनरीजवर चढून जोरदार घोषणाबाजी केली आहे. 

शासनाने जर यासंदर्भात तातडीने चौकशी लावुन कोट्यावधीचं घबाड घशात घालणा-या ठेकेदारावर व त्याला साथ देणा-या शासनातीलंच काही दलालांना कडक शासन केले नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, चंद्रभागेच्या पात्रात मोठे जनआंदोलन उभारून सबंध महाराष्ट्राचे लक्ष या भ्रष्टाचाराकडं वेधून घेऊ. आणि प्रसंगी सेबर टेक्नॉलॉजी च्या या मशिनरी भंगारात घालून टाकू, यावेळी जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील. असा इशाराही महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी दिलाय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages