पाटकुलमध्ये तीव्र पाणीटंचाई; प्रभाकर देशमुखांचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सध्या सार्वजनिक विहिरीत पाणी उपलब्ध असतानाही गावात आठ ते दहा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मोहोळ पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. नव्या पाणीपुरवठा योजनेचे तातडीने लोकार्पण करून दररोज सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली.
देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आष्टी तलावातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेद्वारे पेनूर व पाटकुल गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी चार ते पाच वर्षांपूर्वी योजना मंजूर झाली होती. त्यानुसार पाईपलाईन व पाण्याची टाकी उभारण्यात आली असतानाही अद्याप या गावांना पाणी मिळालेले नाही.
दरम्यान, गावातील सामुदायिक विहिरीजवळ काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीररीत्या खोल बोअरवेल्स पाडल्यामुळे विहिरीतील पाणी टिकत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नाना मोरे, विजय तळेकर, गणेश चवरे, सुरज सातपुते, सत्यवान धावणे, पिंटू पवार, शिवाजी जाधव, समाधान चवरे, गुलाब देशमुख, शहाजी सातपुते, किरण वसेकर, तानाजी मोटे, उमेश माने, मानाजी चवरे आदींनी सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment