सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये ‘जागतिक पृथ्वी दिन’ उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये ‘जागतिक पृथ्वी दिन’ उत्साहात साजरा

 सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये ‘जागतिक पृथ्वी दिन’ उत्साहात साजरा



सोलापूर‌ (कटूसत्य वृत्त):- पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथे ‘जागतिक पृथ्वी दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सोलापूर महानगरपालिका, शाळा प्रशासन आणि इको नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमांतर्गत शाळा परिसरात देशी औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. हरित सजावटीने नटलेला परिसर आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर  ज्ञानेश्वरी महेश देवकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना त्यांनी “पृथ्वी आपली आई असून तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली घोषवाक्ये, पोस्टर प्रदर्शन आणि भाषणे विशेष आकर्षण ठरली. ‘सेव्ह अर्थ, सेव्ह फ्यूचर’चा संदेश देणाऱ्या उपक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासोबतच स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणप्रेम दाखवून दिले.

या प्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व सिंहगड इन्स्टिट्यूट, केगावचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धनासाठी दैनंदिन जीवनातील छोट्या कृतींचे महत्त्व अधोरेखित केले. प्लास्टिकचा वापर टाळणे, पाणी बचत आणि हरित जीवनशैलीचा अवलंब करण्याचे त्यांनी आवाहन केले.

जागतिक पृथ्वी दिनानिमित्त पूर्व-प्राथमिक विभागात रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच पूर्व-प्राथमिक ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रोपांचे वाटप करून जनजागृती केली. घरोघरी जाऊन कागदी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी हरित प्रतिज्ञा घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका शाहीन शेख यांनी पृथ्वी दिनाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी महेश देवकर, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, उपमुख्याध्यापिका निकहत शेख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप पर्यावरण संरक्षणाच्या सामूहिक संकल्पाने करण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागामुळे हा उपक्रम केवळ उत्सव न ठरता एक प्रेरणादायी अनुभव ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages