आपली बस, आपली सेवा’ अभियानातून एसटी प्रवाशांना सन्मानाची वागणूक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि सन्मानपूर्वक सेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘आपली बस, आपली सेवा’ हे विशेष अभियान राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १ मे २०२६ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. सोलापूर विभागासह सर्व आगारांना यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.
खासगी वाहतुकीच्या वाढत्या स्पर्धेमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रवाशांशी सौजन्याने वागणे, त्यांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
अभियानाअंतर्गत चालक, वाहक व कर्मचाऱ्यांना स्वच्छ गणवेश व नेम प्लेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बस सुटण्यापूर्वी वाहकाने प्रवाशांचे अभिवादन करून स्वतःची व चालकाची ओळख करून देणे, तसेच प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अंदाजे वेळ याची माहिती देणे आवश्यक राहणार आहे.
आरक्षित प्रवासी वेळेत बसमध्ये न पोहोचल्यास त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सामानाची सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करणे, मोठ्या बॅगा व्यवस्थित ठेवण्यास मदत करणे यावरही भर दिला जाणार आहे.
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ‘एनसीएमसी’ कार्डचा वापर आणि MSRTC Bus Reservation अॅपद्वारे आगाऊ आरक्षण करण्यास प्रवाशांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच तक्रार निवारणासाठी विभाग स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, तक्रारींचा नियमित आढावा घेतला जाईल.
दरम्यान, बसमध्ये बिघाड झाल्यास प्रवाशांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
.png)
No comments:
Post a Comment