शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे : आ. खरे
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेऊन त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार राजू खरे यांनी दिल्या.
खरीप हंगाम २०२६-२७च्या पार्श्वभूमीवर मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विभागाची आढावा बैठक आ. खरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, अलीकडील काळात अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने दिलासा मिळणे आवश्यक आहे. तसेच अनेक ठिकाणी बंद असलेली हवामान व पर्जन्यमान मोजणी यंत्रे तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पन्न कशा प्रकारे वाढवता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बियाणे, सिंचन व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर तसेच कीड व रोग नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी विभागामार्फत विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व शेतीसाठी आवश्यक अवजारे उपलब्ध करून दिली जात असून, यातील प्रातिनिधिक शेतकऱ्यांना अवजारे वितरीत करण्यात आली. तसेच विविध स्पर्धांमधील गुणवंत शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. हे उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे असल्याचे आ. खरे यांनी नमूद केले.
कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे, रामचंद्र माळी व काजल म्हात्रे यांनी ‘संतुलित खत व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. बैठकीस तालुक्यातील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment