सायबर भामट्यांवर मोठी कारवाई; ९,४०० व्हॉट्सअॅप खाती बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

सायबर भामट्यांवर मोठी कारवाई; ९,४०० व्हॉट्सअॅप खाती बंद

सायबर भामट्यांवर मोठी कारवाई; ९,४०० व्हॉट्सअॅप खाती बंद


नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त):- ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने मोठी कारवाई करत अटक फसवणुकीशी संबंधित तब्बल ९,४०० खाती बंद केली आहेत. ही कारवाई जानेवारी २०२६ पासून करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली.
डिजिटल अटक आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभाग, सेवा प्रदाते, भारतीय रिझर्व्ह बँक, तंत्रज्ञान कंपन्या आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्याकडून समन्वयाने बहुआयामी कारवाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ फेब्रुवारीच्या निर्देशांनुसार गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने सविस्तर स्थिती अहवाल सादर केला आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने डिजिटल अटक प्रकरणांची स्वतःहून दखल घेत कडक निर्देश जारी केले होते. त्यानुसार संशयास्पद ऑनलाइन हालचालींवर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
व्हॉट्सअॅपकडून नवीन सुरक्षा सुविधा आणण्याचा विचार सुरू असून, ‘नवीन’ किंवा ‘संशयास्पद’ खात्यांवरून कॉल आल्यास वापरकर्त्यांना इशारा देण्यात येणार आहे. तसेच भामट्यांना पोलीस किंवा सरकारी यंत्रणांची चिन्हे वापरता येऊ नयेत, यासाठी अज्ञात कॉलर्सचे प्रोफाइल छायाचित्र लपविण्याची स्वयंचलित प्रणाली विकसित केली जात आहे.
याशिवाय ‘चिन्ह ओळख तंत्रज्ञान’ (लोगो डिटेक्शन) द्वारे अधिकृत पोलीस किंवा सरकारी चिन्हे वापरणारी बनावट खाती ओळखून तत्काळ हटवली जाणार आहेत.
दरम्यान, दूरसंचार विभाग आणि दूरध्वनी कंपन्यांकडून बनावट सिमकार्डवरही कडक कारवाई सुरू असून, खात्री झाल्यानंतर २ ते ३ तासांत अशी सिमकार्डे बंद करण्याची यंत्रणा तयार करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages