क्रीडा शिक्षक भरतीसाठी आझाद मैदानात आंदोलन
मुंबई (कटूसत्य वृत्त):- शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण विषयाला महत्त्व असूनही राज्य सरकारकडून दोन दशकांपासून क्रीडा शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पदवीधर बेरोजगार आहेत. सरकारच्या अनास्थेविरोधा महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे २७ एप्रिलपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सरकारी निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांच्या १०० टक्के जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात याव्यात, रिक्त पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन करू नये, पवित्र पोर्टल टेट २०२५ भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा प्रमुख मागण्या महासंघातर्फे
सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात राज्यभरातील पात्रताधारक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक प्रदुम्न जोशी,सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री उमेश चव्हाण सचिव श्रीकृष्ण कोळी उपाध्यक्ष नागेश पाटील प्रदीप शिर्के व राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेंडगे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक बौद्धिक विकासासह सर्वांगीण विकासासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याच माध्यमातून भविष्यातील सक्षम समाज आणि बलशाली राष्ट्रनिर्मितीची पायाभरणी होत असते. मात्र, या विषयाच्या अध्यापनाचे काम करणाऱ्या क्रीडा शिक्षकांच्या पदभरतीकडे सरकारने २० वर्षांपासून दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष संदीप मनोरे यांनी दिली.

No comments:
Post a Comment