नातेपुते येथील निलांबिका लिंगायत महिला मंच व वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने जयंती साजरी
नातेपुते(कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील निलांबिका लिंगायत महिला मंच व वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बसवेश्वरांच्या “कायकवे कैलास” व “दासोह” या तत्त्वांच्या प्रेरणेने लिंगायत समाजाने वृक्षारोपण, मंदिराची स्वच्छता तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता व बंधुतेचा वारसा जपला. नातेपुते येथील विठ्ठल मंदिराजवळ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून समाजातील मुलांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावातील प्रज्ञा रवींद्र ठोंबरे यांची आर. आर. बी स्केल‑वन पदासाठी, महादेव शिवदास लांडगे यांची ग्रामीण पोलीस दलात नियुक्ती तसेच राजवर्धन जयंत चिंचकर यांचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रसंगी चंद्रशेखर शिवगुंडे यांनी “जगदज्योती महात्मा बसवेश्वर व त्यांचे विचार” या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यांनी बसवेश्वरांच्या “कायकवे कैलास” व “दासोह” या दोन तत्त्वांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे विशेष सांगितले. श्रमाशिवाय अन्नग्रहण करण्याचा कोणालाही अधिकार नाही किंवा कोणतेही काम कमी‑अधिक नसते, तर ते किती प्रामाणिकपणे व तळमळीने केले जाते यावर त्याचे महत्त्व अवलंबून असते असे चंद्रशेखर शिवगुंडे यांनी सांगितले.यावेळी निलांबिका महिला मंचच्या अध्यक्षा सुनिता रायचूरे, उपाध्यक्षा सुप्रिया चिंचकर, निलांबिका महिला मंचच्या सर्व सदस्या तसेच वीरशैव लिंगायत समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रशांत सरूडकर यांनी केले.

No comments:
Post a Comment