कोट्यवधींची इमारत… पण शौचालयाला कुलूप!
कळंब प्रशासकीय कार्यालयात महिलांची कुचंबणा?
कळंब (कटूसत्य वृत्त):-उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला; मात्र नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेली शौचालयाची सुविधा आजही बंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे विशेषतः महिलांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
स्थळावर पाहणी केली असता, शौचालयासाठी स्वतंत्र इमारत उभारलेली असूनही त्याला कुलूप लावलेले असल्याचे स्पष्ट दिसून येते. परिसरात वाढलेले गवत, अस्वच्छता आणि देखभालीचा पूर्ण अभाव यामुळे ही सुविधा केवळ दिखाव्यासाठी उभारली का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे अधिकाऱ्यांसाठी कार्यालयात अटॅच शौचालयाची व्यवस्था उपलब्ध आहे, तर दुसरीकडे रोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येथे येत असताना त्यांच्यासाठी कोणतीही मूलभूत सुविधा नाही. विशेषतः महिलांची होणारी कुचंबणा ही अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी बाब ठरत आहे.
महिला सन्मान, स्वच्छता आणि आरोग्याबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात महिलांना शौचालयासाठी वणवण भटकावे लागते, ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची जिवंत साक्ष असल्याची टीका होत आहे.
“जर शौचालय बांधले आहे, तर ते नागरिकांसाठी खुले का नाही?” असा थेट सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याऐवजी त्वरित कृती करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
चौकट : नागरिकांच्या ठाम मागण्या
बंद असलेले सार्वजनिक शौचालय तात्काळ सुरू करावे
स्वच्छता व देखभाल नियमितपणे करावी
महिला व दिव्यांगांसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा उपलब्ध करावी
या गंभीर प्रकाराकडे संबंधित तहसील प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला जात आहे.
चौकट
तहसील कार्यालय ,उपविभागीय कार्यालय व प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालय प्रमुखांना बोलावून याबाबत आम्ही तात्काळ विचारणा करू व त्याबाबत संबंधितांना आम्ही तशा सूचना पण देऊ एखाद्या वेळेस पाणी नसल्यामुळे शौचालय बंद असेल त्यासाठी आम्ही पाण्याची तातडीने व्यवस्था करू व सर्वसामान्यांसाठी शौचालय व स्वच्छतागृह तात्काळ खुले करू- गणेश शिंदे उपविभागीय अधिकारी कळंब .



No comments:
Post a Comment