सिंहगड पब्लिक स्कूल; गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने CBSE दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी करत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत अनेकांनी उच्च टक्केवारीसह विशेष प्रावीण्य मिळवले.
या यशानिमित्त सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या समारंभात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ व सिंहगड इन्स्टिट्यूट, केगावचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा आनंद साजरा केला.
या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. “आमच्या मुलांच्या यशामागे शाळेचे संस्कार आणि शिक्षकांचे परिश्रम आहेत,” अशी भावना पालकांनी व्यक्त केली. “ही शाळा केवळ शिक्षण देत नाही, तर विद्यार्थ्यांना घडवते,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, “हा निकाल केवळ यश नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी आहे,” असे मत व्यक्त केले.
समारंभास प्रशालेच्या मुख्याध्यापिका शाहीन शेख, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, उपमुख्याध्यापिका निकहत शेख तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, सिंहगड पब्लिक स्कूल पुन्हा एकदा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक ठरले आहे.

No comments:
Post a Comment