प्रत्येक नगरसेवकाला ६६ लाखांचा निधी
अंदाजपत्रकात पाणीपुरवठा सुधारणेवर भर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे १४४९ कोटी ७१ लाख ९३ हजार ४०९ रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. गेल्या चार वर्षांनंतर प्रथमच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत तब्बल १२ तास सविस्तर चर्चा होऊन रात्री ११ वाजता या बजेटवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर विनायक कोंड्याल सभेवेळी योग्य समन्वय ठेवल्याचे दिसून आले.
नगरसेवकांना समान निधी आणि विशेष तरतूद
यावेळच्या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनाने सुचवलेली ६० कोटींची करवाढ फेटाळून लावत हे बजेट 'करमुक्त' ठेवण्यात आले आहे.
नगरसेवक निधी: प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ६६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय १६.५० लाख रुपये वॉर्डनिहाय कामांसाठी दिले जाणार आहेत.
पदाधिकारी निधी: महापौरांसाठी ५ कोटी, उपमहापौरांसाठी ३ कोटी, स्थायी समिती सभापतींसाठी ३ कोटी आणि सभागृह नेत्यांसाठी ३ कोटी अशी एकूण १४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा
शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सुधारण्यासाठी १० कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
यासोबतच इतर प्रमुख तरतुदी
खालीलप्रमाणे आहेत:
ड्रेनेज व स्वच्छता: ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येकी ३ कोटी, तर पावसाळी गटारांसाठी ४ कोटी.
आरोग्य व शिक्षण: नवीन शाळा इमारतींसाठी ३.२६ कोटी आणि महिला प्रसूतिगृहांच्या सुधारणेसाठी ३ कोटी.
सुशोभीकरण: शहरातील रस्ते बांधणीसाठी ३ कोटी तर उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी रुपये.
विशिष्ट प्रकल्प: जुळे सोलापूरमध्ये नाट्यगृह आणि इनडोअर स्टेडियमसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद.
महिला आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासा
महिला सुरक्षा: प्रमुख बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ५० लाख आणि महिलांसाठी स्वच्छतागृहे व 'पिंक टॉयलेट' बांधण्यासाठी १ कोटींची तरतूद.
मेडिक्लेम योजना: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ३ कोटी रुपयांची 'मेडिक्लेम' योजना लागू करण्यात आली असून, याचा लाभ ९ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सामाजिक न्याय आणि विकास
अंदाजपत्रकात विविध समाजांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. यात लिंगायत भवन, बसवेश्वर पुतळा दुरुस्ती (६० लाख), पद्मशाली समाज कुलदैवत मार्कंडेय मंदिर परिसर सुधारणा (७५ लाख) आणि नियोजित मराठा भवन बांधकामासाठी १ कोटी रुपयांचा समावेश आहे.
चौकट-
हे वचनपूर्तीचे अंदाजपत्रक आहे. सर्व नगरसेवकांना समान निधी देऊन शहराचा समतोल विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– विनायक कोंड्याल, महापौर, सोलापूर
.png)
No comments:
Post a Comment