भोंदू खरात प्रकरणावर काँग्रेस आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त): नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी केली आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या या गंभीर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली असून, अशोक खरात या स्वघोषित ‘कॅप्टन’ व ज्योतिषाने महिलांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली धमकावून लैंगिक शोषण केल्याचे, तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
सोमवारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणात सखोल व पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली.
या वेळी माजी नगरसेविका भारती इप्पलपल्ली, माजी महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, अॅड. करीमुन्निसा बागबान, कोंडण काकडे, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, पूजा चव्हाण, मुमताज शेख, निर्मला कांबळे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, जयश्री स्वामी, रंजना गायकवाड, श्रीमंतीबाई बनसोडे आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चौकट
तपास पारदर्शकपणे व्हावा : प्रमिला तुपलवंडे
सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांनी सांगितले की, अशोक खरात प्रकरणात मोठ्या प्रमाणावर महिलांचे शोषण झाल्याचे समोर आले असून, यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा संबंध असल्याने तपासावर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करून पीडित महिलांना संरक्षण व न्याय द्यावा, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित लोकप्रतिनिधींवरही कारवाई करून महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment