अवकाळी पावसाचा जिल्ह्याला फटका; ९४ गावे बाधित, ६९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

अवकाळी पावसाचा जिल्ह्याला फटका; ९४ गावे बाधित, ६९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

 अवकाळी पावसाचा जिल्ह्याला फटका; ९४ गावे बाधित, ६९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान



सोलापूर (कटूसत्य वृत्त): जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला असून एकूण ९४ गावे बाधित झाली आहेत. सुमारे ६९० हेक्टरवरील पीकक्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाने केली आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली.
१७ ते २० मार्चदरम्यान सोलापूर शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सांगोला आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटही झाली. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका अक्कलकोट तालुक्याला बसला असून तेथील ४२ गावे बाधित झाली आहेत. सांगोला तालुक्यात २६ गावे, माढा तालुक्यात १० गावे, मंगळवेढा तालुक्यात ५ गावे, तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ८ गावे बाधित झाली आहेत. पंढरपूर व करमाळा तालुक्यांत प्रत्येकी एका गावाचे नुकसान नोंदवले गेले आहे.
या आपत्तीत जिल्ह्यातील १,१९३ शेतकरी प्रभावित झाले असून ४ लहान व ६ मोठी जनावरे दगावली आहेत. सांगोला तालुक्यात सर्वाधिक ७ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर मोहोळ तालुक्यात २ आणि करमाळा तालुक्यात १ जनावर दगावल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.
द्राक्ष, आंबा, केळी पिकांचे मोठे नुकसान
१९ मार्च रोजी झालेल्या पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात २२७ हेक्टरवरील द्राक्ष, आंबा, केळी, खरबूज, मिरची, ज्वारी, हरभरा, गहू व डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात १७ ते १९ मार्चदरम्यान २८९ हेक्टरवरील केळी, आंबा, गहू, हरभरा, ज्वारी, द्राक्ष व भोपळा पिकांना फटका बसला आहे.
तसेच माढा व सांगोला तालुक्यांमध्येही १९ मार्च रोजी झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारी, द्राक्ष, पेरू, आंबा, डाळिंब व केळी पिकांचे नुकसान झाले आहे. माढा तालुक्यात ५८ हेक्टर, तर सांगोला तालुक्यात ११३ हेक्टर पीकक्षेत्र बाधित झाले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून अंतिम अहवालानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages