चार दिवसांत कामांचा अहवाल सादर करा; जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची कडक भूमिका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनावर शिस्तीचा लगाम घालत कामकाजाला वेग देण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय काळातील सर्व विभागांच्या कामांची सविस्तर माहिती पुढील चार दिवसांत सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी त्यांनी बांधकाम विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत २०२२ पासून आतापर्यंतच्या प्रशासकीय कार्यकाळातील सेस फंडची उपलब्धता, त्याचे वितरण, कोणत्या कामांसाठी खर्च करण्यात आला तसेच निधी वाढीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत सविस्तर माहिती २७ मार्चपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेत एकूण १८ विभागांचा आढावा मागविण्यात आला असून, प्रारंभी घेतलेल्या बांधकाम विभागाच्या आढाव्यात अपेक्षित माहिती न मिळाल्याने सर्व विभागांना चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
नव्या नेतृत्वाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शिस्तीचे नवे नियमही लागू केले आहेत. दर सोमवार व गुरुवारी सर्व विभागप्रमुखांनी मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून, नागरिकांची कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना ओळखपत्र (आयडी) वापरणेही सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत शिस्तीचे नवे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.
चौकट
अनुपस्थित शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीसचा इशारा
आढावा बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. स्वतः उपस्थित राहणे अपेक्षित असताना त्यांनी प्रतिनिधी पाठविल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्या प्रतिनिधीकडे आवश्यक माहिती नसल्यामुळे बैठकीत अडथळे निर्माण झाले.
जगताप यांनी अनुपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती का, ते नेमके कुठे गेले होते, याबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सीईओ कुलदीप जंगम यांना देण्यात आले.
No comments:
Post a Comment