होलिका दहनासोबत वाईट विचारांचे कायमचे दहन करावे : लुणावत
मानेगाव परिसरात होळी व धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात
मानेगाव (कटूसत्य वृत्त): फाल्गुन महिन्यातील ‘होळी’ आणि ‘धुलीवंदन’ या सणांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. होलिका दहनाच्या निमित्ताने वाईट विचारांचे आणि दुष्ट प्रवृत्तीचे कायमचे दहन करून चांगल्या विचारांचा स्वीकार केला पाहिजे, असा संदेश या सणातून मिळतो, असे मत माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी व्यक्त केले.
मानेगाव व दारफळ सीना (ता. माढा) परिसरातील विविध गावांमध्ये सोमवारी होळी तर मंगळवारी धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना लुणावत म्हणाले की, इतिहासात नेहमीच वाईटावर चांगल्या प्रवृत्तीचा विजय झालेला आहे. होळी हा सण त्याचाच संदेश देणारा आहे.
होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी व गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला गेला. घरासमोर तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या पेटवून होलिका दहन करण्यात आले. वेगवेगळ्या घोषणा देत अबालवृद्धांनी पारंपरिक ‘बोंब’ प्रथा जोपासली.
धुलीवंदन अर्थात शिमग्याच्या दिवशी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देण्यात आल्या. या दिवशी बहुतांश घरांमध्ये मांसाहारी जेवणाचा विशेष बेत करण्यात आला. शासकीय सुट्टी असल्याने शाळकरी मुले व बालगोपाळांनीही सणाचा आनंद द्विगुणित केला. गावोगावी दोन्ही सणांचा आनंद मनसोक्त लुटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
No comments:
Post a Comment