दुबईत अडकले भारतीय ज्योतिषी; ‘भविष्यवेत्त्यांनाच स्वतःचे भविष्य कळले नाही?’ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 3, 2026

दुबईत अडकले भारतीय ज्योतिषी; ‘भविष्यवेत्त्यांनाच स्वतःचे भविष्य कळले नाही?’

 दुबईत अडकले भारतीय ज्योतिषी; ‘भविष्यवेत्त्यांनाच स्वतःचे भविष्य कळले नाही?’ 



पुणे (कटूसत्य वृत्त) :- दुबई येथे 28 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष परिषदेनंतर भारतातील काही ज्योतिषी आणि पुरोहित अनपेक्षित परिस्थितीत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. परिषद संपल्यानंतर भारतात परतण्याच्या तयारीत असतानाच दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विमानसेवा विस्कळीत झाली आणि त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले.


या परिषदेसाठी उज्जैन येथील प्रसिद्ध कालभैरव मंदिर चे मुख्य पुरोहित विकास शर्मा तसेच राजस्थानमधील डिंग जिल्ह्यातील तरोडर गावचे रहिवासी आणि स्थानिक पातळीवर परिचित ज्योतिषी रंगनाथ शर्मा उपस्थित होते. परिषदेनंतर दोघेही परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर पोहोचले; मात्र अचानक उड्डाणे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.


काही तास विमानतळावर प्रतीक्षा केल्यानंतर विमानसेवा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल याबाबत निश्चित माहिती देणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर संबंधितांना जिथे मुक्कामाची व्यवस्था आहे तिथेच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. सध्या हे सर्वजण दुबईतच थांबले असून दररोज कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत आहेत.


दरम्यान, शर्मा कुटुंबीयांनी राजस्थान सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. राज्य सरकारने संबंधितांशी संपर्क कायम ठेवला असून परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याची माहिती मिळते.


या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर आणि स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे. इतरांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना स्वतःच्या प्रवासातील अडचणींचा अंदाज का आला नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. “येत्या आठवड्यात कोणती आपत्ती येणार आहे हे भाकीत करणारे ज्योतिषी स्वतःवर ओढवणारी संकटपरिस्थिती ओळखू शकले नाहीत का?” अशी टीका केली जात आहे.


उज्जैनमधील कालभैरव मंदिरात दर्शन घेतल्यास मनोवांछित फळ मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. अशा मंदिराचे मुख्य पुरोहित असलेले विकास शर्मा दुबईत अडकून पडल्याने काहींनी धार्मिक दाव्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.


रंगनाथ शर्मा हे संस्कृतचे अध्यापक असून उजव्या विचारसरणीचे आणि कट्टर शाकाहारी असल्याचे सांगितले जाते. परिषदेस गेलेल्या अनेक सहभागींची पार्श्वभूमी साधारण अशीच असल्याचे समजते. मुस्लिमबहुल आणि आधुनिक जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशात परिषदेस जाण्याबाबत त्यांच्या धर्म, विचारसरणी किंवा आहारविषयक भूमिकांमध्ये कोणताही अडथळा आला नाही, याकडेही काहींनी लक्ष वेधले आहे.


या घटनेमुळे संबंधित ज्योतिषांची प्रतिमा धुळीस मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी समाजमनाची दिशा वेगळी असल्याचे जाणकार सांगतात. संकटातून सुखरूप परतल्यानंतर त्यांच्या कार्याला अधिक प्रसिद्धी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिजिटल माध्यमांच्या युगात अशा घटनांमुळे सहानुभूतीची लाट निर्माण होऊन त्यांच्या व्यवसायाला चालना मिळू शकते, असेही काहींचे मत आहे.


सध्या तरी सर्वांचे लक्ष विमानसेवा पूर्ववत होण्याकडे लागले आहे. परिस्थिती निवळल्यानंतर हे सर्व भारतीय नागरिक सुखरूप परततील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages