‘मानसिक आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता’
मुंबई (कटूसत्य वृत्त):- मानसिक आरोग्य सेवांसाठी पारंपरिक वैद्यकीय चौकटीपलीकडे जाऊन समुदायआधारित, सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील आणि सहकार्यावर आधारित मॉडेल विकसित करण्याची गरज असल्याचे मत या क्षेत्रात काम करीत असलेल्या तज्ज्ञांनी अधोरेखित केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित दोन दिवसीय ‘पल्स 2026’ परिषदेत आयोजित मानसिक आरोग्य विषयक सत्रात डॉ. हमिद दाभोलकर, राज मरीवाला आणि रत्नबोली रॉय यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी याबाबतीतली आपली भूमिका स्पष्ट केली. मानसिक आरोग्य ही केवळ डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील बाब नसून ती संपूर्ण समाजाशी निगडित असल्याचे त्यांनी सांगितले. कंटेंट क्रिएटर प्राजक्ता कोळी यांनी चर्चासत्राचे संचालन केले.
डॉ. दाभोलकर म्हणाले, ग्रामीण भागात किंवा वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतील लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत वेगवेगळ्या श्रद्धा आणि समजुती असतात. त्यामुळे सेवा देताना त्या-त्या संस्कृतीशी सुसंगत दृष्टिकोन आवश्यक आहे. भारतात मानसिक आरोग्य तज्ज्ञांची संख्या अत्यल्प असल्याने सर्वांना सेवा पोहोचविण्यासाठी समुदाय पातळीवरच प्रणाली उभी करणे अपरिहार्य आहे. आशा कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या सहभागातून घरपोच सेवा देणारी यंत्रणा उभी करता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी सहकार्यात्मक आरोग्यसेवा या संकल्पनेवरही भर देण्यात आला.
तज्ज्ञ, सामान्य वैद्यकीय कर्मचारी आणि समुदाय यांच्यात समन्वय साधल्यास मानसिक आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते, असे ते म्हणाले. रत्नबोली रॉय यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, मानसिक आरोग्य पुनर्वसनाच्या प्रक्रियेतील सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला. अनेक रुग्ण दीर्घकाळ मानसिक आरोग्य संस्थांमध्ये राहिल्यानंतर समाजात परतताना त्यांच्यासमोर ओळख, उपजीविका आणि सन्मान या मूलभूत प्रश्नांचे आव्हान उभे राहते. पुनर्वसन म्हणजे केवळ लक्षणमुक्त होणे नव्हे, तर ‘मी कोण आहे’ आणि ‘माझे आयुष्य कसे घडवायचे’ याचे उत्तर मिळणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले. रोजगार, सामाजिक सहभाग आणि स्वाभिमान हे
पुनर्वसनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले. क्लिनिकल उपचारांबरोबरच सामाजिक पुनर्वसनाला तितकेच महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज मरीवाला यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात केवळ नैराश्य किंवा चिंता यांसारख्या निदानांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सामाजिक कारणांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. भारतातील आत्महत्यांच्या घटनांपैकी मोठा भाग हा सामाजिक घटकांमुळे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मानसिक आरोग्याचा विचार व्यापक सामाजिक संदर्भात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वयंसेवी संस्था, निधी देणाऱ्या संस्था आणि धोरणनिर्माते यांना दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक समुदायआधारित उपक्रमांना पाठबळ देण्याचे आवाहन केले. युवकांनीही आपल्या परिसरात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून सहकाऱ्यांना मदत करण्याची भूमिका निभावावी, असे त्यांनी सांगितले.
.jpg)
No comments:
Post a Comment