शेळगीतील श्री जागृत मारूती देवस्थानात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा भव्य महाप्रसादाचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील भवानी पेठ परिसरातील शेळगी रोडवरील श्री जागृत मारूती देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत हा धार्मिक सोहळा पार पडणार असून, यानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवस्थानाचे प्रमुख मल्लिनाथ तोटद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भवानी पेठेतील दयानंद महाविद्यालयाजवळील शेळगी परिसरात असलेल्या या देवस्थानात दरवर्षी हनुमान जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे.
या सोहळ्यानिमित्त भक्तांसाठी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विरपाक्ष हुणजे, दीपक बोडा, विश्वनाथ बिडवे, सिद्धाराम यलशेट्टी, प्रवीण इरकशेट्टी, मल्लिकार्जुन तोटद, निलेश अंकम, रवी मेळे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, या सोहळ्यात अधिकाधिक भाविकांनी सहभागी होऊन हनुमान जन्मोत्सवाचा आनंद घ्यावा, तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस सिद्धाराम येलशेट्टी, विश्वनाथ बिडवे, प्रवीण इरकशेट्टी, रवी मेळ्ळे, निलेश अंकम आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment