सोलापूर जिल्हा परिषद गटांना मिळणार २१ कोटींचा विकासनिधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

सोलापूर जिल्हा परिषद गटांना मिळणार २१ कोटींचा विकासनिधी

 सोलापूर जिल्हा परिषद गटांना मिळणार २१ कोटींचा विकासनिधी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाजपच्या विजयी झालेल्या ३८ जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षांत प्रत्येक सदस्याच्या मतदारसंघात विकासकामांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा शब्द ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, दीपक साळुंखे-पाटील, शहाजी पवार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, मनपा गटनेते नरेंद्र काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकांनी विश्वासाने विजयी केल्यामुळे आता जबाबदारी वाढली असल्याचे सांगत मंत्री गोरे म्हणाले की, पुढील पाच वर्षे जनतेशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा. शेतकरी कुटुंबातील शेतमजूर किंवा शेतकरी जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो, हे केवळ भाजपमध्येच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व सदस्यांनी आचार-विचार आणि वर्तन चांगले ठेवून जनतेशी सुसंवाद साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, जनतेने दाखवलेल्या विश्वासाला साजेस काम करण्याचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेत भाजपचे ३८ सदस्य विजयी होत प्रथमच सत्ता मिळाली असून सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठीच केला जाईल.

माजी आमदार राजन पाटील यांनी जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असून मागील काही वर्षांतील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पक्षाने बार्शी तालुक्यावर विश्वास दाखवत अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करत हा विश्वास कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रशांत परिचारक, नूतन अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

'सुफडा साफ'वर टोला

निवडणुकीपूर्वी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचा सुफडा साफ करू, असे वक्तव्य केले होते. यास प्रत्युत्तर देताना मंत्री गोरे म्हणाले, नगरपालिकांमध्ये सर्वाधिक १४४ नगरसेवक, महापालिकेत ८७ नगरसेवक, ११ पैकी १० पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती व उपसभापती, तसेच आता जिल्हा परिषदेत स्वबळावर अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे कोणाचा सुफडा साफ झाला, हे त्यांनीच ठरवावे, असा टोला त्यांनी लगावला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages