पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात


44 प्रवाशांनी भरलेली बस पलटी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि. २०) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून पुण्याकडे जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात बसमधील सुमारे ४४ प्रवासी थोडक्यात बचावले असून तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या बसमध्ये अंदाजे ४४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला जोडणाऱ्या बारामती फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे हा परिसर सध्या अपघातप्रवण ठरत आहे. मागील तीन महिन्यांपासून येथे सातत्याने लहान-मोठे अपघात घडत असून, काही अपघातांमध्ये जीवितहानीही झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी मालवाहू कंटेनर भंगार दुकानात घुसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी हायवा वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ४ जानेवारी २०२६ रोजी ट्रकने कारला धडक दिल्याने दोन महिला जखमी झाल्या होत्या. तसेच फेब्रुवारी महिन्यात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती.

वाहनचालकांचा उडतोय गोंधळ

सध्या उड्डाणपूल बांधकामामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. रस्त्यावरील खोदकाम, वाकडे-तिकडे वळण आणि अपुरी सूचना यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. संबंधित ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना न केल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाने तातडीने माहिती फलक, दिशादर्शक चिन्हे व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

सुरक्षेअभावी अपघातांना आमंत्रण

बारामती फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येत आहे. वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वाहतूक कोंडीही वारंवार होत असून, वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नेमणे, मजबूत संरक्षक कठडे उभारणे आणि स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. अपुऱ्या सुरक्षेमुळे या ठिकाणी जीवघेण्या अपघातांत वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages