आषाढी वारीच्या 'टेंडरचा मेळा' भरणार सोलापूरमध्ये
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर आषाढी वारीसाठी तात्पुरत्या स्वरूपात पुरवण्यात येणाऱया सोयीसुविधांमध्ये सर्वाधिक खर्चाचा आकडा असलेल्या फिरत्या शौचालयाचे पुण्यासह सातारा आणि सोलापूरचे टेंडर आता पुणे जिल्हा परिषदेऐवजी सोलापूर जिल्हा परिषदेतून निघणार आहे.
ग्रामीण विकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्याकडे असलेले शौचालयाचे टेंडर खेचून सोलापूरकडे नेले आहे. तसेच अहिल्या नगर नाशिक आणि जळगावमधीलही टेंडरचे दर सोलापूर जिल्हा परिषद ठरवणार असून एक प्रकारे आषाढी वारीच्या 'टेंडरचा मेळा' सोलापूरमध्ये भरणार आहे.
आषाढी वारीच्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत असणारी फिरती शौचालये, स्वच्छता संबंधित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, पाणीपुरवठय़ासाठी टँकर आणि स्वच्छता दिंडीचे नियोजन तसेच आवश्यक औषधे खरेदी या कामांचे टेंडर पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिह्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेतून काढण्यात येत होते. मात्र जयकुमार गोरे यांनी ही ई-टेंडर प्रक्रिया सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत करण्याचे आदेश काढले आहेत. या टेंडरची किंमत जवळपास 100 कोटींच्या दरम्यान असेल.
जलरोधक मंडप आणि जर्मन हंगरदेखील
पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी जलरोधक मंडप व जर्मन हंगर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीदेखील सोलापूर जिल्हा परिषदेने निविदा प्रक्रिया राबवावी, असेही या आदेशामध्ये म्हटले आहे.

No comments:
Post a Comment