करमाळ्यात १० दिवसांत ५ महिला बेपत्ता; गुढ वाढल्याने पोलिस अलर्टवर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

करमाळ्यात १० दिवसांत ५ महिला बेपत्ता; गुढ वाढल्याने पोलिस अलर्टवर

 करमाळ्यात १० दिवसांत ५ महिला बेपत्ता; गुढ वाढल्याने पोलिस अलर्टवर




करमाळा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून गेल्या दहा दिवसांत पाच महिला आणि तरुण मुली बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एकामागोमाग एक घडणाऱ्या या प्रकारांमुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, यामागे काही संघटित टोळी सक्रिय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा तातडीने तपासासाठी कामाला लागली असून विविध मार्गांनी शोध सुरू आहे. एकाच भागातून इतक्या मोठ्या संख्येने महिला बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासनासमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातून फक्त १० दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणांहून ५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. महिला बेपत्ता होऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने करमाळा पोलिसही अलर्ट झाले आहे. पोलिसांनी या सर्व घटनांची गंभीर दखल घेत महिलांना शोधण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. करमाळा पोलिसांनी एक सुचना जारी केली आहे. ” बेपत्ता झालेल्या महिलां महिला किंवा तरुणींबाबत काहीही माहिती मिळाल्यास, त्यांनी त्वरित करमाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.

२२ मार्च रोजी बोरगाव येथून ३५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्यापासून या घटनांची मालिका सुरू झाली. त्यानंतर २३ मार्चला करमाळा शहरातून २१ वर्षीय तरुणी आणि मोरवड येथून २० वर्षीय युवती अचानक बेपत्ता झाली. हे सत्र येथेच न थांबता २५ मार्च रोजी पांगरे येथील ३५ वर्षीय महिला आणि उमरड येथील ५१ वर्षीय प्रौढ महिला देखील घरातून निघून गेल्या असून त्या अद्याप परतलेल्या नाहीत. अवघ्या चार दिवसांत २० ते ५१ वयोगटातील पाच महिला बेपत्ता झाल्याने संपूर्ण तालुक्यात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे.

परिसरात भीती आणि संभ्रम

एकाच तालुक्यात अवघ्या १० दिवसात ५ महिला बेपत्ता झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “मुलींना एकटं बाहेर पाठवताना आता भीती वाटत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, या घटनांमागे एखादी संघटित टोळी काम करतेय का कि कोणी वैयक्तिक कारणांसाठी असे करत आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातून एकामागोमाग एक महिला बेपत्ता होण्याच्या धक्कादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर करमाळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. पोलीस प्रशासनाने तालुक्यातील सर्व पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे कडक आदेश दिले आहेत. संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि महत्त्वाच्या चेक पोस्टवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे. बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पातळीवर विशेष पथके तैनात करण्यात आली असून, पोलीस प्रशासन सर्व यंत्रणांच्या मदतीने या प्रकरणाचा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages