सोलापूर जिल्हा परिषदेकडून ४५.८३ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक सादर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी ४५ कोटी ८३ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. प्रशासकीय कार्यकाळातील हे त्यांचे चौथे अंदाजपत्रक असल्याचे सांगण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी झालेल्या बैठकीत २०२५–२६ चे सुधारित आणि २०२६–२७ चे मूळ अंदाजपत्रक मांडण्यात आले. या अंदाजपत्रकानुसार जिल्हा परिषद सेसद्वारे ४५ कोटी ८३ लाख रुपयांची अपेक्षित आवक तर ४५ कोटी ७४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. यामधून ८ लाख ९२ हजार रुपयांची शिल्लक अपेक्षित आहे.
अंदाजपत्रकात विविध विभागांसाठी वाढीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागासाठी ५ कोटी, शिक्षणासाठी ५ कोटी ३३ लाख, महिला व बालकल्याणासाठी ३ कोटी २५ लाख, ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी ३ कोटी ९६ लाख, कृषी विभागासाठी ३ कोटी ८५ लाख, पशुसंवर्धनासाठी ३ कोटी २० लाख, समाजकल्याणासाठी ४ कोटी ७२ लाख तर बांधकाम विभागासाठी सर्वाधिक ८ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनासाठी ५ कोटी २५ लाख आणि ग्रामपंचायत विभागासाठी २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वीच प्रशासनाने घाईघाईत अंदाजपत्रक सादर केल्याची चर्चा रंगली आहे. नव्या सदस्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याची टीका काही वर्तुळांतून होत आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले की, जिल्हा परिषद अधिनियमातील कलम ४५(५) नुसार २७ मार्चपूर्वी अंदाजपत्रक मांडणे आवश्यक होते. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड, त्यानंतर सभापती निवड आणि आवश्यक कालावधी लक्षात घेता वेळेत अंदाजपत्रक मांडणे शक्य नसल्याने प्रशासनाकडून ते सादर करण्यात आले. नव्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक ते बदल करण्याची मुभा राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment