अध्यात्मिक उर्जा, एकतेचा संदेश आणि इंसानियतची शिकवण, सोलापुरात ईदचा मंगल उत्सव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त आज पहाटेपासूनच श्रद्धा, शांतता आणि एकतेचे अत्यंत भावपूर्ण चित्र पाहायला मिळाले. शेकडो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि “सर्वांसाठी सुख-शांती” अशी प्रार्थना अल्लाहकडे मागितली.
महिनाभर चाललेल्या संयम, त्याग आणि आध्यात्मिक साधनेनंतर आलेल्या ईदने शहरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण केले. रोजे पाळत, कुरआन पठण करत आणि आत्मशुद्धी साधत मुस्लीम बांधवांनी या पवित्र महिन्याचा अर्थ जपला. त्याचबरोबर जकात आणि फित्रा देत गरजू व वंचित घटकांनाही सणाचा आनंद मिळावा याची जाणीवपूर्वक काळजी घेतली गेली.
ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सामूहिक नमाजानंतर एकमेकांना मिठी मारत “ईद मुबारक”च्या शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. या क्षणांतून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि आपुलकीचे जिवंत दर्शन घडले.
होटगी रोड परिसरातील आलमगीर ईदगाह येथे शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा करण्यात आली. तसेच आसार मैदान ईदगाह येथे सकाळी १०:३० वाजता नमाज पार पडली. रंगभवन येथील अहले हादिस ईदगाहमध्ये सकाळी ७:३० वाजता हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते, येथे मौलाना ताहेर बेग यांनी नमाज पठण केली.
पांगल मैदानातील शाही आलमगीर ईदगाह येथे सकाळी ९ वाजता नमाज अदा करण्यात आली. मौलाना सय्यद अहमद गौरी हैद्राबादी यांनी नमाजानंतर सामूहिक प्रार्थना केली. जुनी मिल कंपाऊंड येथील ईदगाहमध्येही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नवीन कपडे, सुगंधित इत्र आणि डोळ्यांत सुरमा लावून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ईदच्या आनंदात सहभागी झाले होते. येथे मोहम्मद सय्यद फजुलूल्लाह खतीब यांनी नमाज अदा केली.
नमाजानंतर सर्वत्र गळाभेटी, शुभेच्छा आणि आपुलकीचा वर्षाव पाहायला मिळाला. अनेकांनी एकमेकांना घरी येण्याचे निमंत्रण देत पारंपरिक सुरकुर्मा आणि गुलगुले यांचा आस्वाद घेण्याचा आग्रह केला.
या पवित्र सणानिमित्त विविध धर्मगुरूंनी समाजाला मौलिक संदेश दिले.
“समानता, क्षमा आणि मानवतेचा आदर्श म्हणजे ईद”
प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनातील मक्केच्या विजयाचा प्रसंग सांगत मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी क्षमा, समानता आणि बंधुभाव यांचे महत्त्व अधोरेखित केले. द्वेष सोडून प्रेम पसरवण्याचे आवाहन त्यांनी केले.
“आपल्यातला भेदभाव आणि स्वार्थ सोडा”
मौलाना ताहेर बेग यांनी सांगितले की, फक्त नमाज आणि रोजे पुरेसे नाहीत, तर आपल्या वर्तनातही सकारात्मक बदल दिसला पाहिजे. शेजाऱ्याच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी ईद असल्याचे त्यांनी नमूद केले.
“समाजात शांतता टिकवणे हिच खरी ईद”
मौलाना सादिक मणियार यांनी रमजान महिन्याचा संदेश सांगताना गरजूंची मदत आणि समाजात शांतता राखणे हेच ईदचे खरे सार असल्याचे स्पष्ट केले.
“ईदचा खरा अर्थ – इंसानियत”
सय्यद मोहम्मद खतीब यांनी नफरत दूर ठेवून प्रेम, सहकार्य आणि एकतेने समाज घडवण्याचे आवाहन केले.
“द्वेष आणि मत्सर टाळा, प्रेम वाढवा”
मौलाना सय्यद अहमद गौरी यांनी इस्लामच्या शिकवणीतून प्रेम, करुणा आणि सहकार्य या मूल्यांचा संदेश देत शांततापूर्ण समाजनिर्मितीवर भर दिला.
एकंदरीत, रमजान ईदनिमित्त सोलापूर शहरात प्रेम, एकता, शांतता आणि इंसानियतचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला. हा सण केवळ आनंद साजरा करण्याचा नसून, समाजात सौहार्द आणि परस्पर आदर वाढवण्याची प्रेरणा देणारा ठरला.

No comments:
Post a Comment