प्रेम, शांतता आणि भाईचाऱ्याचा संदेश देत अक्कलकोटमध्ये ईदचा उत्सव साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

प्रेम, शांतता आणि भाईचाऱ्याचा संदेश देत अक्कलकोटमध्ये ईदचा उत्सव साजरा

 प्रेम, शांतता आणि भाईचाऱ्याचा संदेश देत अक्कलकोटमध्ये ईदचा उत्सव साजरा




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट शहरातील शाही ईदगाह मैदानावर ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत सामुदायिक नमाज पठण करून अल्लाहकडे सुख, शांती आणि भाईचाऱ्याची प्रार्थना केली.

सकाळी सुमारे ८:३० वाजल्यापासूनच मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर दाखल होऊ लागले. नवीन कपडे, सुगंधित इत्र आणि डोळ्यांत सुरमा लावून सर्वांनी अत्यंत श्रद्धेने नमाज अदा केली. ईदगाह परिसरात एकतेचे आणि भक्तीचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.

या वेळी मौलवी यांनी खुतब्यातून मार्गदर्शन करताना समाजात प्रेम, शांतता आणि भाईचारा टिकवण्याचे आवाहन केले. “आपण सर्वांनी एकमेकांच्या धर्माचा आदर ठेवत देशात सामाजिक सलोखा आणि ऐक्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असा संदेश त्यांनी दिला.

नमाजानंतर देशातील शांतता, बंधुभाव, परस्पर आदर आणि विश्वशांतीसाठी अल्लाहकडे विशेष दुआ करण्यात आली. या पवित्र क्षणांत सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, अक्कलकोट पोलिस प्रशासनाकडूनही ईदगाह मैदानावर उपस्थित मुस्लिम बांधवांना आणि लहान मुलांना गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक दीपक भिताडे आणि एपीआय निलेश भागवत यांनी या उपक्रमातून सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याचा संदेश दिला.

यावेळी दिलीप सिद्धे व अविनाश मडीखांबे यांनीही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणित केला.

एकूणच, अक्कलकोट शहरात ईद-उल-फित्रचा सण प्रेम, आपुलकी, शांतता आणि एकतेचा संदेश देत अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages