‘महाज्योती’त भ्रष्टाचाराचा भडका!
हेमंत पाटील यांची भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'महाज्योती' अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचा आरोप अत्यंत गंभीर आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करीत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.१८) केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षातील आमदारानेच महाज्योती मधील भ्रष्टाचार उघडकीस आणत त्यांची विधानसभेला दखल घेण्यास भाग पाडले. अशात या प्रकरणाचे गांभीर्य सरकारने लक्षात घ्यावे, असे पाटील म्हणाले. कौशल्य विकास प्रशिक्षणाचे काम विशिष्ट संस्थेला निविदा प्रक्रिया न काढताच देण्यात आले. जवळपास ५०० कोटींचा गैरव्यवहार यातून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशात महाज्योती तसेच तत्सम संस्थांसंबंधी तक्रारींसाठी मंत्रालय स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप होत असतांना देखील बहुजन विकासमंत्री अतुल सावे संबंधित अधिकाऱ्यांची पाठराखण करताना दिसून येत आहेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्याऐवजी सावे यांनी संबंधितांना घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. पारदर्शक तसेच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या हाती विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित संस्थांचा कारभार सरकारने द्यावा, अशी मागणी देखील पाटील यांनी केली.

No comments:
Post a Comment