उजनी प्रदूषणावर १०० कोटींची मागणी; पर्यटन विकासासोबत शुद्धीकरणावर भर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

उजनी प्रदूषणावर १०० कोटींची मागणी; पर्यटन विकासासोबत शुद्धीकरणावर भर

 उजनी प्रदूषणावर १०० कोटींची मागणी; पर्यटन विकासासोबत शुद्धीकरणावर भर



पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- उजनी धरणाच्या पर्यटन विकासासाठी शासनाने ५४१ कोटी १८ लाखांचा आराखडा मंजूर केला असताना, त्यातील किमान १०० कोटी रुपये पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी खर्च करावेत, अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केली.

राज्यात पर्यटनवृद्धीसाठी विविध उपक्रम राबवले जात असून उजनी धरणावर राष्ट्रीय दर्जाचे कृषी पर्यटनस्थळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विविध भागांतून येणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे धरणातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी मंजूर निधीपैकी १०० कोटी रुपये प्रदूषण नियंत्रणासाठी वापरण्याची गरज असल्याचे आवताडे यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात उजनी धरणावर अवलंबून आहे. सिंचन व पाणीपुरवठा योजनांसाठी हे धरण महत्त्वाचे असून, पाण्याचे शुद्धीकरण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. उजनी धरण सोलापूर, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये पसरले असून सुमारे १४५ किलोमीटर परिसर व्यापते. तसेच धरणाजवळून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि कुटूंबाडी, भिगवणमार्गे जाणारा रेल्वेमार्ग असल्याने जलपर्यटनासाठी ही मोठी संधी आहे.

याशिवाय पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर ही प्रमुख तीर्थक्षेत्रे जवळ असल्याने उजनीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणे गरजेचे आहे. मात्र, त्यासोबतच पाण्याचे शुद्धीकरण आणि पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नावर उत्तर देताना कृषी, मदत व पुनर्वसन तसेच वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी, याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय केला जाईल, असे आश्वासन दिले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages