🌡️ सकाळच्या सत्रातील शाळांबाबत दोन दिवसांत निर्णय; सीईओंशी चर्चा करणार – शेख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

🌡️ सकाळच्या सत्रातील शाळांबाबत दोन दिवसांत निर्णय; सीईओंशी चर्चा करणार – शेख

 सकाळच्या सत्रातील शाळांबाबत दोन दिवसांत निर्णय; सीईओंशी चर्चा करणार – शेख



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर व जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिले. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शिक्षणाधिकारी शेख यांची भेट घेऊन सकाळच्या सत्रातील शाळा तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती संघटना, अल्पसंख्यांक शिक्षक संघटना, जुनी पेन्शन संघटना, दिव्यांग शिक्षक संघटना आदी संघटनांचे जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत सन २०२४-२५ च्या संच मान्यतेतील त्रुटी दूर झाल्याशिवाय शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच तालुकास्तरावर प्रथम समायोजन करून अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन करावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

याशिवाय जनगणना कामासाठी महसूल विभागाला देण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या यादीत आजारी शिक्षक, इयत्ता पाचवी व आठवीच्या नव्या वर्गांसाठी आवश्यक नैसर्गिक वाढ याबाबत स्पष्ट मार्गदर्शन द्यावे, पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतन लागू करावे, प्रज्ञाशोध परीक्षेच्या तारखेत बदल करावा, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करावे तसेच जुनी पेन्शन योजना लागू झालेल्या शिक्षकांच्या एनपीएस रकमा जीपीएसमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही करावी, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकाळच्या सत्राचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी शिक्षक कृती समितीने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages