सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकप तर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जनआंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर तसेच जिल्हा सचिव कॉ युसुफ शेख मेजर यांनी केले.
माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की , इराणवर अमेरिका व इस्रायल यांनी केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्यपूर्वेतील तणाव तीव्र झाला असून जागतिक शांततेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
माकपचा ठाम विश्वास आहे की युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. संवाद, मुद्सेद्दीगिरी आणि शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच मतभेद सोडवले जावेत. लष्करी हस्तक्षेपामुळे निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत, तेलाच्या किमती वाढत असून सर्वसामान्यांवर महागाईचा अतिरिक्त भार पडत आहे, असे त्यांनी नमूद केले.
आडम मास्तर यांनी केंद्र सरकारला आवाहन करताना सांगितले की, भारताने आपल्या स्वतंत्र व निर्भीड परराष्ट्र धोरणाची परंपरा जपत या हल्ल्यांचा स्पष्ट शब्दांत निषेध करावा व तात्काळ युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढाकार घ्यावा. भारत हा शांतता, सहअस्तित्व आणि निर्गुट परंपरेचा पुरस्कर्ता देश असून त्याने ठाम युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी.
निदर्शनादरम्यान पुढील मागण्या मांडण्यात आल्या :
1. इराणवरील सर्व लष्करी हल्ले तात्काळ थांबवावेत.
2. तातडीने युद्धविराम जाहीर करून शांततापूर्ण चर्चेला सुरुवात करावी.
3. शांततेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर तोडगा काढावा.
4. भारत सरकारने स्पष्ट युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी.
5. माकप हा शांतता, लोकशाही आणि जनतेच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून आंतरराष्ट्रीय पातळीवर साम्राज्यवाद व आक्रमणवादाच्या विरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
काळे झेंडे, घोषणाबाजी करत पुतळा दहन
जिल्हा परिषद पुनम गेट येथून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, काळी वस्त्रे व काळ्या फिती लावून घोषणाबाजी केली. “युद्ध नको, शांतता हवी” अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यांहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र माकप कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतल्याने संबंधित कार्यकर्ते मागे पळून गेले त्यानंतर पोलिस व माकप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली.
या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. एम. एच. शेख, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, ॲड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, नरेश दुगाणे, दाऊद शेख, अकील शेख, मल्लेशाम कारमपुरी, अशोक बल्ला, वीरेंद्र पद्मा, सनी शेट्टी, बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, अभिजित निकंबे, रफिक काझी, वसीम देशमुख, आसिफ पठाण, प्रदीप मरेड्डी, तबसुम शेख, मोहन कोक्कुल,अफसाना बेग आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अनिल वासम यांनी केले, तर पक्षाची अधिकृत भूमिका कॉ. एम. एच. शेख यांनी मांडली.

.jpeg)

No comments:
Post a Comment