धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठीही लढणार : मनोज जरांगे-पाटील
करमाळा (कटूसत्य वृत्त):- “देशाला वाचविण्यात शहीदांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृतिदिनी उपस्थित राहणे हे माझे भाग्य आहे,” असे सांगत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणानंतर धनगर, मुस्लिम आणि बंजारा समाजाच्या आरक्षणासाठीही लढा देणार असल्याची घोषणा केली. करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्ती येथे शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमावेळी जरांगे-पाटील यांचे जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. धनगर समाजाच्या वतीने त्यांना घोंगडी, काठी, फेटा व हार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जरांगे-पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक, सामाजिक, शौर्य, कृषी व क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
आरक्षणाचा पुढील लढा
आपल्या भाषणात जरांगे-पाटील म्हणाले की, सातारा, पुणे, औंध आणि कोल्हापूर संस्थानांच्या गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या कामातून मी मोकळा होईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार असून तो मुद्दा हातात घेतला तर निकाल लावल्याशिवाय थांबणार नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत चौंडी येथे दिलेला शब्द पाळणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुणबी दाखल्यांवरून प्रशासनाला इशारा
सोलापूर जिल्ह्यातील, विशेषतः कुर्डुवाडी प्रांत कार्यालयातील प्रलंबित कुणबी दाखल्यांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. करमाळा तालुक्यातील दाखले व व्हॅलिडीटी का थांबवली आहे, याची माहिती घेत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी कोणतेही प्रमाणपत्र प्रलंबित ठेवू नये, असा इशारा दिला. याबाबत उपसमितीशी चर्चा करून सर्व प्रमाणपत्रे देण्यास सांगणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
परदेशात अडकलेल्या प्रवाशांबाबत पाठपुरावा
दुबई तसेच इराण-इस्त्रायल भागात अडकलेल्या भारतीय प्रवाशांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, एका युवतीच्या फोननंतर तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून कार्यवाही सुरू असून प्रशासन प्रक्रिया राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment