सोलापूरच्या विकासाचा प्रश्न: आश्वासनांच्या गर्दीत अडकलेले शहर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 16, 2026

सोलापूरच्या विकासाचा प्रश्न: आश्वासनांच्या गर्दीत अडकलेले शहर

 सोलापूरच्या विकासाचा प्रश्न: आश्वासनांच्या गर्दीत अडकलेले शहर



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून विविध मूलभूत समस्या व विकासकामांच्या रखडलेल्या प्रकल्पांमुळे सोलापूर शहर अक्षरशः हतबल झाले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, उद्योग, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक विकास अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे सोलापूरकरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून शहराच्या विकासाबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही अपेक्षित गंभीरता दिसून येत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत  असल्याचे मत विविध संघटनां चालक व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भोसले यांनी व्यक्त केले.
दररोज पाणीपुरवठ्याचे आश्वासन अजूनही अपूर्ण
गेल्या वीस वर्षांपासून शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन निवडणुकांच्या वेळी वारंवार देण्यात आले. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्चही करण्यात आला. मात्र आजही सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
५४ मीटर रस्ता प्रकल्प आठ वर्षांपासून रखडलेला
छत्रपती संभाजीनगर ते सोरेगाव या ५४ मीटर रुंदीच्या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रकल्प गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला आहे. महापालिकेकडे ५६ कोटी रुपयांचा निधी नसल्याचे कारण देत हा प्रकल्प प्रलंबित ठेवण्यात आला आहे. सध्या असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून त्याचे दुष्परिणाम पुढील काळात स्पष्टपणे दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विमानसेवेचा गाजावाजा; प्रत्यक्षात मर्यादित सेवा
सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र आजही फक्त काही शहरांपुरतीच सेवा मर्यादित आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक परवानग्यांबाबत न्यायालयीन स्तरावर कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही.
उद्योगविकासाचा अभाव; तरुणांचे स्थलांतर
सोलापूरमधील अनेक तरुण शिक्षण व रोजगारासाठी इतर शहरांकडे वळत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात उद्योग उभारणीसाठी आवश्यक निर्णय प्रलंबित आहेत. आयटी क्षेत्राच्या विकासाबाबतही अनेक घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात प्रगती झालेली दिसत नाही.
इलेक्ट्रिक बस प्रकल्पही ठप्प
आठ महिन्यांपूर्वी शहरात नवीन इलेक्ट्रिक बस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप चार्जिंग स्टेशनच तयार झालेले नाही. याआधीही सुमारे १०० बसेस सोलापूरमध्ये आणण्यात आल्या होत्या, मात्र त्या बस एक दिवसच रस्त्यावर धावल्या आणि नंतर बंद पडल्या. या प्रकरणात सुमारे ८९ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते, तर न्यायालयीन प्रक्रियेतही मोठा खर्च झाला असून बसेस सध्या निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत.
उड्डाणपूल प्रकल्पही रखडलेले
शहरातील बहुचर्चित दोन उड्डाणपूल प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. अनेक वेळा उद्घाटने झाली, परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झाली नसल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
पूल बांधकामांमध्ये अडथळे
रामलाल चौकातील जुन्या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन पुलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र डिझाइन मंजुरी व इतर तांत्रिक बाबींमुळे काम पुढे सरकत नाही. तर आसरा चौकातील पुलाचे काम पाणीपुरवठा पाइपलाइन आडवी आल्यामुळे सहा महिन्यांपासून थांबले आहे.
शैक्षणिक प्रकल्पही रखडले
शासकीय तंत्रनिकेतनच्या मोठ्या इमारतीत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. आर्थिक तरतुदीअभावी हा प्रकल्पही पुढे सरकत नाही.
सांस्कृतिक व क्रीडा सुविधांचा अभाव
इतक्या मोठ्या शहरात एकच नाट्यगृह आणि एकच एसटी स्थानक असल्याची परिस्थिती आहे. जुळे सोलापूर भागात नवीन जलतरण तलाव उभारण्याची घोषणा अनेक वर्षांपूर्वी झाली होती; मात्र तीही अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. महापालिकेवर सुमारे ५०० कोटी रुपयांचे कर्ज असून उत्पन्न सुमारे ६०० कोटी असल्याने विकासकामांसाठी निधीची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
टेक्सटाईल उद्योगाला आवश्यक पाठबळ नाही


सोलापूरचा टेक्सटाईल उद्योग मोठ्या प्रमाणावर असून येथे मोठे टेक्सटाईल पार्क उभारण्याची क्षमता आहे. मात्र अक्कलकोट व कुंभारी एमआयडीसी परिसरातही मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उद्योगविकासाला मर्यादा येत आहेत.


पर्यटन व सार्वजनिक सुविधांचा अभाव


बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी शहरात पुरेशा बागा, चांगली मैदाने किंवा आधुनिक मनोरंजन सुविधा उपलब्ध नाहीत. अॅडव्हेंचर पार्कसारख्या प्रकल्पांचा अभावही प्रकर्षाने जाणवतो.


जुळे सोलापूर व हद्दवाढ भागाकडे दुर्लक्ष


जुळे सोलापूर व हद्दवाढ भागातून मोठ्या प्रमाणावर कर महसूल मिळत असतानाही त्या भागासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. मुलींच्या आयटी इमारतीसह उद्योग भवनसारख्या इमारती अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहेत.


सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौक्यांची गरज


शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, सण-उत्सव आणि विविध कार्यक्रम होत असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी किमान सहा ते आठ नवीन पोलीस चौक्या व एक नवीन पोलीस परिमंडळ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


सोलापूरकरांची सकारात्मक आशा कायम


या सर्व समस्या असूनही सोलापूरकरांमध्ये शहराच्या विकासाबाबत आशा कायम आहे. भविष्यात शहरातील तरुणांनी रोजगारासाठी बाहेर जाण्याऐवजी इतर राज्यांतील युवकांनी सोलापूरमध्ये येऊन उद्योग व व्यवसाय सुरू करावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यासाठी सर्व स्तरांवर ठोस प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages