भाऊसाहेब मोरे स्मृती व्याख्यानमालेत विविध विषयांवर मार्गदर्शन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भाऊसाहेब मोरे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वर मोरे बिगरशेती ग्रामीण पतपुरवठा संस्था, वडवळ यांच्या वतीने लोकरत्न भाऊसाहेब मोरे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १ एप्रिल ते शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वडवळ येथील मैदानावर ही तीन दिवसीय व्याख्यानमाला होणार आहे.
बुधवार दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पोपटबुवा शिवपुजे खर्गे महाराज व आकाशबुवा शिवपुजे खर्गे महाराज यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव, विमलताई खताळ, बालाजी नरुटे व लखन शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील असतील, तर माजी आमदार यशवंत माने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानंतर सायं. ७.३० वाजता राहुल गिरी (गेवराई) यांचे “संस्काराची शिदोरी – वर्तमान पिढीची जबाबदारी” या विषयावर व्याख्यान होईल.
गुरुवार दि. २ एप्रिल रोजी सायं. ७ वाजता लोकरत्न भाऊसाहेब मोरे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंचायत समितीचे नूतन सभापती अस्लम चौधरी, उपसभापती उल्का पाटील तसेच सदस्यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळराजे पाटील असतील, तर भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सायं. ७.३० वाजता प्रबोधनकार गणेश शिंदे (अहिल्यानगर) यांचे “हे जीवन सुंदर आहे” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी सायं. ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात येईल. यावेळी कृषी उपसंचालक पदावर निवड झाल्याबद्दल मयुरी सर्जेराव गायकवाड यांचा सत्कार होणार आहे. सायं. ७.३० वाजता शिवव्याख्याते ज्ञानदेव काशिद (बीड) यांचे “असा राजा होणे नाही” या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक सहकारी संस्था मोहोळ सुमित कवडे असतील, तर सहाय्यक निबंधक एस. टी. तेलंगरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात ठसा उमटवणारे भाऊसाहेब मोरे यांच्या कार्यातून युवकांना प्रेरणा मिळावी व समाजात प्रबोधनात्मक विचार रुजावेत, या उद्देशाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेस नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन राहुल मोरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बापूसाहेब दळवे, सूर्यकांत मोरे, शाहू धनवे, सुशांत मोरे, निलेश व्यवहारे, संतोष पवार, दीपक काकडे, अमोल शिंदे, लक्ष्मण मळगे, बापू शिंदे तसेच भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
.jpeg)
No comments:
Post a Comment