पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमणीचे संवर्धन करणे गरजेचे आहे -प्रा. धनंजय देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमणीचे संवर्धन करणे गरजेचे आहे -प्रा. धनंजय देशमुख

 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमणीचे संवर्धन करणे गरजेचे आहे -प्रा. धनंजय देशमुख   



        

       
अकलूज (कटूसत्य वृत्त):- मानवाच्या सभोवतालच्या निसर्गात अनेक प्रकारचे पक्षी आढळतात परंतु निसर्गाच्या अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक म्हणजे चिमणी आहे परंतु चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे शहरीकरण, अन्नसाखळीतील बदल,किटकांची कमतरता आणि घरट्यांसाठी जागेचा अभाव ही कारणे अधिक महत्त्वाची आहेत म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमणीचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पक्षीमित्र प्रा.धनंजय देशमुख यांनी केले.      
              यशवंतनगर येथील महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेमध्ये  जागतिक चिमणी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.प्रा.देशमुख म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमण्या महत्त्वाची भूमिका बजावतात.त्या लहान कीटकांवर उपजीविका करतात आणि त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने कीटक नियंत्रणात मदत करतात. शेती क्षेत्रात अनेक प्रकारचे कीटक पिकांचे नुकसान करतात.चिमण्या आणि इतर पक्षी हे कीटक खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे शेतीचे अप्रत्यक्ष संरक्षण होते.काही वेळा चिमण्या बिया आणि धान्य खाल्ल्यानंतर त्या इतर ठिकाणी पसरवतात.चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात.त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे अन्न साखळीतील बदल शेतीमध्ये आणि बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे कीटकांची संख्या कमी होत गेल्यामुळे पिलांना पुरेसे अन्न मिळणे कठीण झाले आहे.त्याचा अप्रत्यक्ष परिणाम चिमण्यांवर झाला आहे. चिमण्यांच्या घटत्या संख्येबाबत सर्वाधिक चर्चेत आलेले कारण म्हणजे मोबाईल टॉवर्स.मोबाईल फोनच्या वापरात वाढ झाल्यानंतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवर्स उभारले गेले.या टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय किरणोत्सर्जनामुळे चिमण्यांच्या अंड्यांवर परिणाम होतो म्हणजेच मानवासाठी उपयुक्त असलेल्या टॉवरच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या बळी चिमण्या ठरत आहेत.पूर्वीच्या घरांची रचना चिमण्यांसाठी अनुकूल होती. मातीच्या भिंती,कौलारू छप्पर, लाकडी बीम,छपराच्या कडांमधील फटी,वाड्यांच्या अंगणातील झाडे या सर्व गोष्टी चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य जागा देत असत.घराच्या ओसरीत ठेवलेले धान्य,गिरण्या,बाजारपेठा,धान्याची दुकाने यामुळे चिमण्यांना अन्नाची कमतरता भासत नसे.त्यामुळे गावामध्ये चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.परंतु शहरीकरणामुळे या परिस्थितीत मोठा बदल झाला.काँक्रीटच्या उंच इमारती,काचांच्या बंद खिडक्या, पूर्णपणे सीलबंद बांधकाम आणि स्वच्छतेच्या बदललेल्या पद्धती यामुळे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी आवश्यक जागाच उरलेली नाही.यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्लेट, बॉटल, लाकडी बॉक्स, पाईप यापासून निवारा, अन्नधान्य तसेच पाण्याची साधने कशाप्रकारे बनवायचे याचे प्रात्यक्षिक प्रा.देशमुख यांनी करून दाखविले.
                   यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल जाधव,पर्यवेक्षक उमेश बोरावके, ज्येष्ठ शिक्षक राजाराम काळे, शिक्षिका भाग्यश्री उरवणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक गळीतकर सर यांनी केले. सूत्रसंचालन नागेश सोनवणे यांनी तर आभार बिभीषण जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages