पांडुरंग साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; २०२६-२७ गळीत हंगामाची तयारी सुरू
श्रीपूर (कटूसत्य वृत्त) :- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ दर्शविणारे मिल रोलर पूजन चेअरमन तथा माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमास व्हा. चेअरमन कैलास खुळे, उमेशराव परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, दिनकरराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. ए.आय. तंत्रज्ञानाचा प्रसार कारखाना स्तरावरून केला जात असून, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. ही योजना कारखाना, शेतकरी आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२६-२७ साठी सुमारे १०,५०० हेक्टर क्षेत्रातील उसाची नोंद झाली आहे. सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे उत्पादनात चढ-उतार होण्याची शक्यता असली तरी उपलब्ध होणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यात येईल.
कारखान्यामार्फत ऊस उत्पादकांसाठी विविध विकास योजना राबविण्यात येत असून गळीत हंगाम विनाखंड सुरू ठेवण्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. ऊस तोडणीसाठी आवश्यक यंत्रणा उभारणी व करार प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव यांच्यासह अनेक अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment