आ. अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने सापटणे-वेणेगाव शीव रस्ता खुला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 1, 2026

आ. अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने सापटणे-वेणेगाव शीव रस्ता खुला

आ. अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने सापटणे-वेणेगाव शीव रस्ता खुला



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सापटणे टें ते वेणेगाव दरम्यानचा अनेक दिवसांपासून प्रलंबित बंद असलेला शीव रस्ता अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने खुला करण्यात आला असून परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने या भागातील नागरिकांतून माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

या शीव रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले. आमसभेत हा विषय ठामपणे उपस्थित झाल्यानंतर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आणि प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानुसार माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून शीव रस्ता खुला करण्याची कार्यवाही केली. या वेळी टेंभुर्णीचे मंडल अधिकारी सुजित शेळवणे, मेजर राजेंद्र चव्हाण, वेणेगावचे तलाठी माने, सापटणेचे टें तलाठी विश्वास, नायब तहसीलदार भडकवाड, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे दत्तात्रय वाघमारे, तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित केली आणि अडथळे दूर करून शीव रस्ता मोकळा करण्यात आला. शीव रस्ता खुला झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे आभार मानले. अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न निकाली निघाल्याने शेतकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचेही कौतुक केले. या कार्यवाहीमुळे सापटणे व वेणेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठीचा मार्ग पुन्हा सुरळीत झाला आहे.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages