आठवडी बाजार दिवशीच अधिकारी अनुपस्थित; नागरिक हैराण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 1, 2026

आठवडी बाजार दिवशीच अधिकारी अनुपस्थित; नागरिक हैराण

 आठवडी बाजार दिवशीच अधिकारी अनुपस्थित; नागरिक हैराण




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- शहरात दर सोमवारी भरल्या जाणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात उपस्थित राहावेत, अशी मागणी विविध गावांतील सरपंच व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

अक्कलकोटचा आठवडी बाजार हा तालुक्यातील गाव, वाड्या-वस्त्यांतील नागरिकांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. या दिवशी शेतकरी, शेतमजूर आणि कामगार मोठ्या संख्येने बाजारासह शासकीय कामांसाठी शहरात येतात. अनेकांसाठी सोमवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने याच दिवशी शासकीय कामे उरकण्यावर भर असतो. मात्र, प्रत्यक्षात अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याची तक्रार आहे.

याच दिवशी विविध सुनावण्या तसेच साप्ताहिक व मासिक बैठका आयोजित केल्या जात असल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. काम वेळेत पूर्ण न झाल्याने गावाकडे जाणाऱ्या बसेस चुकण्याची वेळ येते. परिणामी काहींना बसस्थानकावर मुक्काम करावा लागल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून सोमवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, तसेच नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी विशेष वेळ निश्चित करावा, अशी मागणी होत आहे. याचबरोबर सोमवारी ‘जनता दरबार’ स्वरूपात कामकाज ठेवावे व त्या दिवशी कोणत्याही बैठका किंवा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेऊ नयेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


अक्कलकोट येथील भूमी अभिलेख कार्यालयात सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी होत असून शेतजमिनींसंबंधी कामांसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते. मात्र, उपअधीक्षक अनुपस्थित असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे. या प्रकरणातही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages