अध्यापनात ‘एआय’चा वापर काळाची गरज- सुभाष माने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बदलत्या शैक्षणिक प्रवाहात तंत्रज्ञानाची सांगड घालणे अत्यावश्यक असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर शिक्षकांनी आपल्या अध्यापनात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांनी केले.
सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, जितेश वस्तू भांडार LLP संचलित नवनीत ट्रेडर्स, सोलापूर, जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात शहरातील मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी सुभाष माने बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निरंतर शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, नियंत्रण समितीचे सचिव रंगसिद्ध दसाडे, प्राचार्य महेश सरवदे, रविशंकर कुंभार, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय गाजरे, सचिव विद्यानंद स्वामी, विद्या सचिव डॉ. श्रीपाद सुरवसे, नवनीत ट्रेडर्सचे मयूर शहा आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शहरातील विविध शाळांमधील १०२ मुख्याध्यापक आणि २१० तंत्रस्नेही शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर यांनी ‘अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रतीक मुनोत यांनी तंत्रज्ञानामुळे अध्यापन प्रक्रिया कशी सोपी व परिणामकारक होऊ शकते याचे प्रात्यक्षिक सादर केले. शेवटच्या सत्रात प्रा. डॉ. इसाक मुजावर यांनी ‘ऑफिस ते वर्ग’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शहर मुख्याध्यापक संघाचे इरफान शेख, इस्माईल शेख, राम ढाले, कार्तिक चव्हाण तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विद्यानंद स्वामी यांनी केले.

No comments:
Post a Comment